फरार असताना दत्तात्रय गाडेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? मानेवर व्रण, पोलीस आयुक्तांची माहिती..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:38 IST2025-02-28T12:36:09+5:302025-02-28T12:38:12+5:30
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण सर्च ऑपरेशन बाबत माहिती दिली.

फरार असताना दत्तात्रय गाडेचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? मानेवर व्रण, पोलीस आयुक्तांची माहिती..
-किरण शिंदे
पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवार-शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री १.३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या मानेवर दोरखंडासारखे व्रण आढळल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? याचा तपास करण्याची गरज आहे, असे पुणेपोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरोपी गाडेच्या अटकेनंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शोध मोहिमेबाबत माहिती दिली.
५०० हून अधिक पोलिसांचा शोध मोहीमेत सहभाग
अमितेश कुमार म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांचे विशेष पथक गुणाट गावात आरोपीचा शोध घेत होते. ५०० हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर, पहाटे १.१० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गाडेच्या अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या मानेवर दोरखंडासारखे व्रण आढळले आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का, हे तपासावे लागेल. आरोपीच्या जखमांबाबत अधिक चौकशी केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
विशेष तपास पथक आणि समुपदेशक नियुक्त
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. तसेच, पीडितेला आवश्यक मानसिक आधार मिळावा म्हणून विशेष समुपदेशकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे विशेष लक्ष
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरातील टेकड्या, निर्जन स्थळे आणि डार्क स्पॉट्सचा आढावा घेतला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वारगेट एस.टी. स्थानकाच्या सुरक्षेचे ऑडिट पूर्ण
स्वारगेट एस.टी. स्थानकाच्या सुरक्षिततेबाबत बसचे दरवाजे, बेवारस वाहने, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. परिवहन विभागासोबत चर्चा करून लवकरच ठोस सुरक्षा उपाय राबवले जातील.
“अधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींवर विशेष लक्ष” – पोलिस आयुक्त
शहरातील ज्या व्यक्तींवर एकापेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
ग्रामस्थांचे पोलिसांना सहकार्य
गुणाट गावातील ४००-५०० ग्रामस्थांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले. पोलिस आयुक्तांनी गावकऱ्यांचे आभार मानले असून, लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.