विवाहित असतानाही प्रेमाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:39 IST2025-07-12T19:38:35+5:302025-07-12T19:39:15+5:30
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, तीन वर्षे सात महिन्यांपासून आरोपी जेलमध्ये आहे. आरोपीचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध आहेत. आरोपीची पत्नी अणि पीडित मुलीचे भांडण झाले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहित असतानाही प्रेमाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
पुणे : विवाहित आणि दोन मुले असतानाही प्रेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
जेव्हियर पाॅल कोल्व्हिन उर्फ दादू कोल्व्हिन असे जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. ॲड. नीलेश वाघमोडे व ॲड. तुषार वाघमोडे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ॲड. वाघमोडे यांना ॲड. ओमप्रकाश भालदाने व ॲड. ऋषिकेश दराडे यांनी सहकार्य केले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर उत्तम नगर पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 354d,376 ,323, 504,506 अणि बाल लैंगिक अधिनियम कलम 8,4 नुसार गुन्हा दाखल झाला. आरोपीला अटक झाली. त्यानंतर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपीने ॲड. नीलेश वाघमोडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली.
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, तीन वर्षे सात महिन्यांपासून आरोपी जेलमध्ये आहे. आरोपीचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध आहेत. आरोपीची पत्नी अणि पीडित मुलीचे भांडण झाले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.