Pune Water Bill: महापालिका थकबाकी भरेना; पुण्याचा पाणीपुरवठा बंद होणार..! मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:34 IST2026-02-17T10:33:12+5:302026-02-17T10:34:07+5:30
Pune Municipal Corporation Water Bill: जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे पुण्याचा मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार; ९३३ कोटी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

Pune Water Bill: महापालिका थकबाकी भरेना; पुण्याचा पाणीपुरवठा बंद होणार..! मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार
PMC Water Bill: जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी वापरासाठी महापालिकेला ११.६० टीएमसी पाणीकोटा मंजूर केला आहे. हा कोटा येत्या पंधरा दिवसांत संपणार असून, महापालिकेकडील आतापर्यंत असलेली ९३३ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येईल, असा गर्भित इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.
गेल्या महिन्यातही जलसंपदा विभागाने ९५३ कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस बजावली होती. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार महापालिका दर महिन्याला केवळ दहा कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिका ही रक्कम भरेल की जलसंपदा विभाग पाणीपुरवठा खंडित करेल, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुणेकरांची तहान भागविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी ११.६० टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील एकूण २९ टीएमसीपैकी बाष्पीभवन वगळता उर्वरित पाणी ग्रामीण भागातील शेती सिंचनासाठी वापरण्यात येते. मात्र, जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार महापालिकेने गेल्या वर्षी २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण वापराच्या ८.८४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापर केला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अतिरिक्त २५ टक्के पाणीवापर केल्यास दीडपट, तर त्यापेक्षा जास्त वापर केल्यास पाणी वापर दराच्या तीन पट दंड आकारला जातो.
महापालिकेकडून २०१६ पासून अतिरिक्त पाणी वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला तरतुदीनुसार दंड आकारणी केली आहे. महापालिकेकडे आतापर्यंत ९५२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांच्या पाणीपट्टीपोटी १९ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम जलसंपदा विभागाकडे जमा केली आहे. तरीदेखील फेब्रुवारीअखेर महापालिकेकडे ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. थकबाकी असली तरी महापालिका दर महिन्याला केवळ १० कोटी रुपयांचीच पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे जमा करीत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ३१ जानेवारीअखेर महापालिकेने ११.२३ टीएमसी पाणीवापर केला आहे. उर्वरित ०.३६ टीएमसी पाणीवापर येत्या १२ दिवसांत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वार्षिक मंजूर पाणी कोटा संपत आला असून, त्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे इतर उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमधून आपल्या पातळीवर तरतूद करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. त्यामुळे महापालिकेने आतापर्यंतची ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी तत्काळ द्यावी, अशी मागणी ही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मंजूर पाणी कोटा संपल्यानंतर तो तत्काळ खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.