Pune Airport : प्रवासी घाबरले... अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचे लँडिग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:41 IST2025-09-07T20:41:22+5:302025-09-07T20:41:49+5:30
एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स २७१७ या विमानाने रविवारी दुपारी अडीच वाजता पुण्यासाठी उड्डाण केले.

Pune Airport : प्रवासी घाबरले... अर्धा तास घिरट्या घातल्यानंतर विमानाचे लँडिग
पुणे : भुवनेश्वरवरून पुण्याला येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस (आयएक्स २७१७) या विमानाला रविवारी पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवता आले नाही. त्यामुळे विमानाला विमानतळ परिसरात अर्धा तास आकाशात घिरट्या घालाव्या लागल्या. शेवटी अर्ध्या तासानंतर विमान सुरक्षित विमानतळावर उतरले. विमानाला उतरता न आल्यामुळे प्रवासी घाबरले होते.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स २७१७ या विमानाने रविवारी दुपारी अडीच वाजता पुण्यासाठी उड्डाण केले. हे विमान पुण्यात साडेतीन वाजता उतरणे अपेक्षित होते. त्यानुसार नियोजित वेळेत हे विमान पुणे विमानतळाच्या धावपट्टी पर्यंत पोहोचले. पण, या विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला धावपट्टीवर उतरता आले नाही. त्यामुळे या विमानाने पुन्हा उड्डाण घेतले. या घटनेमुळे विमानातील प्रवासी घाबरले. त्यांना विमान धावपट्टीवर का उतरत नाही हे समजले नाही.
पुणे विमानतळ परिसरात अर्धा तास विमानाने घिरट्या घातल्या. शेवटी चार वाजून पाच मिनिटांनी विमान पुण्यात उतरले. त्यावेळी प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.