Pune Airport : पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेटवर पाणीच पाणी;प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:26 IST2025-05-20T16:25:01+5:302025-05-20T16:26:53+5:30
- प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनांना आणि सोडण्यासाठी आलेल्या वाहनांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागला.

Pune Airport : पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेटवर पाणीच पाणी;प्रवाशांची गैरसोय
- अंबादास गवंडी
पुणे : शहरामध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे विमानतळावरील एक्झिट गेटवर पाण्याचे तळे साचले. त्यामुळे प्रवाशांना त्या पाण्यातूनच वाट काढत यावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
सोमवारी संध्याकाळी विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नव्या टर्मिनलवरील एक्झिट गेटसमोर पाण्याचे तळे साचले होते. लवकर पाणी निचरा न झाल्याने पार्किंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनांना आणि सोडण्यासाठी आलेल्या वाहनांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. सायंकाळच्या सुमारास पुणे विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची संख्या जास्त असते. त्यामुळे प्रवासीदेखील मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात; परंतु, पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
कोट्यवधी रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या या नव्या टर्मिनलवर पाणी साचल्याने कामाविषयी अनेक तर्कवितर्क प्रवाशांनी व्यक्त केले. पावसाळा अजून सुरू झालेला नाही. अवकाळी पावसामुळेच एवढे पाणी साचल्याने पावसाळ्यात काय परिस्थिती होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या पावसाचा विमान उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.