पुणेकरांनो, हवा झाली विषारी..! वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार, गर्भवती महिलांवरही गंभीर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 23:00 IST2026-02-24T22:58:09+5:302026-02-24T23:00:02+5:30
- शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, घशात खवखव, दमा, ब्रॉन्कायटिस आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यांत वाढली

पुणेकरांनो, हवा झाली विषारी..! वाढत्या प्रदूषणामुळे वाढले श्वसन विकार, गर्भवती महिलांवरही गंभीर परिणाम
पुणे : शहरासह औद्योगिक परिसरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणामुळे श्वसन विकार, घशाचे संसर्ग आणि ऍलर्जीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांमध्ये याचा अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे. धुरकट वातावरण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन ही प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे ठरत आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, घशात खवखव, दमा, ब्रॉन्कायटिस आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यांत वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, हवेत असलेले सूक्ष्म कण, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारखे प्रदूषक थेट श्वसनमार्गावर परिणाम करतात. त्यामुळे घशाला सूज येणे, संसर्ग होणे आणि दमा तीव्र होणे अशी लक्षणे दिसून येतात.
दरम्यान, नागरिकांनीही वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास बाहेर पडणे टाळावे, एन-९५ मास्कचा वापर करावा, घरात एअर प्युरिफायरचा वापर करणे शक्य असल्यास करावा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा संतुलित आहार घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, प्रशासन आणि नागरिकांनी मिळून प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
मुलांमध्ये ऍलर्जीचे प्रमाण वाढले :
शाळकरी मुलांमध्ये वारंवार सर्दी-खोकला, श्वास लागणे आणि छातीत घरघर होण्याचे आणि संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बाळांना मातेकडून होणारे स्तनपान संरक्षण करू शकते. अलीकडच्या काळात बाळांना स्तनपान करण्याऐवजी बाहेरील प्रोस्टेड मिल्क दिले जाते. वाहनांचा धूर, बांधकामातील आणि रस्त्यावरील धूळ आदी प्रदूषणामुळे अस्थमा ट्रिगर होत असून, मुलांमध्ये नाक चोंदणे, श्वास घेण्यास तक्रारी वाढत आहेत. धूळीसोबत इतर संसर्गजन्य विषाणूही श्वासावाटे थेट शरिरात प्रवेश करतात. देशात होणाऱ्या बालमृत्येंमागे निमोनिआ, वाढलेला संसर्ग आणि संबंधीत गुंतागुंत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी मुलांना घराबाहेर घेऊन जाताना त्यांच्या तोंडावर मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. - डॉ. शैलेजा माने, बालरोग तज्ज्ञ.
गर्भधारणेवरही परिणाम :
वाढते वायू प्रदूषण गर्भधारणेवरही विपरीत परिणाम करू शकते. संशोधनानुसार प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास विशेषत: सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींकडून होणाऱ्या वायू प्रदुषणामुळे अकाली प्रसूती, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, तसेच गर्भाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांनी शक्यतो प्रदूषण जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, बाहेर पडताना योग्य मास्कचा वापर करावा आणि घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. सकाळच्या वेळेत प्राणायाम केल्यास शरिराची ऑक्सिजन पातळी चांगली राहिल्याने गर्भातील बाळांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरेल. - डॉ. शिल्पा नाईक, स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ
घशाच्या संसर्गात वाढ
हवेत वाढलेल्या धुळीमुळे घशात कोरडेपणा, जळजळ आणि संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. वारंवार घसा बसणे, आवाज बसणे किंवा गिळताना त्रास होणे अशी लक्षणे आढळत आहेत. पुरेसे पाणी पिणे, कोमट पाण्याने गुळण्या करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स न घेणे आवश्यक आहे. - डॉ. संतोष माने, कान-नाक-घसा तज्ज्ञ
प्रशासनाने शहरातील प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करावी. रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी, बांधकामस्थळी धूळ प्रतिबंधक जाळी लावणे यासारखे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि वृक्षारोपण यावर भर देणे आवश्यक आहे. - जेष्ठ पर्यावरणप्रेमी नागरिक