शिरूर चौफुला महामार्गावर दुभाजकावर ट्रक पलटी; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:15 IST2025-04-17T13:14:47+5:302025-04-17T13:15:49+5:30
- स्थानिकांकडून दुभाजक काढून त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

शिरूर चौफुला महामार्गावर दुभाजकावर ट्रक पलटी; जीवितहानी नाही
केडगाव (ता. दौंड) : शिरूर चौफुला महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा ट्रकने दुभाजक ओलांडत थेट पलटी घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनचालक हैराण झाले आहे.
अधिकच्या माहितीनुसार, पारगाव मोसे बुद्रुक येथे नव्याने तयार होत असलेल्या टोल नाक्याजवळील दुभाजकावर पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटमुळे दुभाजक न दिसल्याने हा अपघात घडल्याचे ट्रकचालकाचे म्हणणे आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातानंतर लगेच दोन अन्य गाड्या या पलटी झालेल्या कंटेनरवर आदळल्या. या अपघातात जीवित हानी झाली नाही. या घटनेआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी केडगाव उड्डाणपुलाजवळ यात्रेसाठी आलेल्या लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच भागातील मिशन कॉर्नर येथे शाळेच्या बसला ट्रक धडकला होता. सुदैवाने विद्यार्थी आधीच उतरले होते. अशा घटनांमुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, दुभाजक काढण्याची मागणी जोर धरत आहे. दुभाजक हटवावेत, स्पीड ब्रेकर बसवावेत आणि चांगले फलक लावावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळेजवळ असलेल्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकरची तातडीने गरज आहे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर ऋचा बारडकर, अभियंता (शिरूर चौफुला महामार्ग) यांनी सांगितले की, प्रशासनाकडून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. कंत्राटदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. जनजागृतीद्वारे वाहनचालकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिकांची मुख्य मागणी म्हणजे रस्त्यावरील दुभाजकांची पुनर्रचना, स्पीड ब्रेकरची बसवणी व अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज. अन्यथा हा महामार्ग 'अपघातमृत्यू महामार्ग' म्हणून ओळखला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.