देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; बारामतीतील दांपत्याचा जागीच मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:57 IST2025-12-03T17:56:32+5:302025-12-03T17:57:10+5:30
हुबळी जवळ बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास एका ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने जगताप यांची कार ट्रकवर जाऊन आदळली आणि भीषण अपघात झाला.

देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; बारामतीतील दांपत्याचा जागीच मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी
बारामती - तिरुपती येथून देवदर्शन करून परतीच्या वाटेवर येत असताना बारामती शहरातील जगताप कुटुंबावर काळाने घाला घातला. बुधवारी (दि. ३०) पहाटे हुबळीजवळ झालेल्या अपघातात जगताप दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच जगताप दांपत्याच्या मुलांना गंभीर दुखापत झाली आहे.
अनिल सदाशिव जगताप (वय ५०), वैशाली सदाशिव जगताप (वय ४५) तसेच त्यांची मुले अथर्व (वय २४) व अक्षता (वय २०) हे चौघेजण सोमवारी (दि. १) तिरुपती येथे अन्य नातेवाइकांसह दोन वाहनांमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. तिरुपती येथे देवदर्शन उरकून जगताप कुटुंबीय परतीच्या वाटेवर होते. मंगळवारी (दि. २) रात्री १०.३० च्या सुमारास जगताप कुटुंबीय आणि अन्य नातेवाइकांनी बेंगळुरू येथे जेवण केले. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले असताना हुबळी जवळ बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास एका ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने जगताप यांची कार ट्रकवर जाऊन आदळली आणि भीषण अपघात झाला.
पाठीमागून दुसऱ्या कारमधून आलेल्या त्यांच्या नातेवाइकांनी स्थानिकांच्या व महामार्ग पोलिसांच्या मदतीने सर्वांना हुबळी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात वैशाली जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या अनिल जगताप यांना रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचेही निधन झाले. त्यांच्या दोन्ही मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बारामती एमआयडीसीतील एका बड्या कंपनीत अनिल जगताप हे प्रोजेक्ट टीमचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी वैशाली या इंजिनीयर असून कॉम्प्युटर व्यवसाय सांभाळत होत्या. मुलगा अथर्व वैमानिक प्रशिक्षण घेत आहे, तर मुलगी अक्षता आयटी इंजिनिअर असून पुण्यातील एका कंपनीत नोकरी करते.