राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:03 IST2025-03-12T12:52:41+5:302025-03-12T13:03:16+5:30

- या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले

pune accident news terrible accident in Rajgurunagar A reckless car driver hit three two-wheelers and six to seven people | राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक

राजगुरुनगरमध्ये भीषण अपघात; बेधुंद कार चालकाची तीन दुचाकी अन् सहा ते सात व्यक्तींना धडक

राजगुरुनगर - राजगुरुनगर परिसरात सातकरस्थळ येथे मंगळवारी (दि ११) रात्री हिट अँड रन प्रकरण घडले. बेधुंद अवस्थेतील कार चालकाने वेगवेगळ्या ठिकाणी तीन दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला पायी जाणाऱ्या तीन बांधकाम मजुरांना धडक दिली. या धडकेत कार ओढ्यात पडली.  झाडेझुडपे असल्याने कारचे नुकसान झाले नाही. तर चालकही सुखरूप राहिला. यावेळी चालक पुर्णपणे नशेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. वाडा रस्त्यावर सातकरस्थळ हद्दीतील ओढ्यावर रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडा रस्त्यावर चासच्या बाजूने कार चालक वेगात येत होता. खांडगे लॉन कार्यालय समोर त्याने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघेजण खाली पडून जखमी झाले. त्यानंतर सातकरस्थळ ग्रामपंचायत इमारती समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला धडक दिली.



इथे दुचाकीस्वार वाचला पण दुचाकीचे पुर्ण नुकसान झाले. तिसऱ्या ठिकाणी म्हणजे प्ले टोर इमारती समोर पायी जाणाऱ्या तीन बांधकाम मजुरांना धडक देऊन पुढे लगेचच दुचाकीला जोराची धडक दिली. या सलग दोन धडकेने कार ओढ्यात जाऊन पडली. पहिल्या तिघांमधील एकाच्या पायाचा चेंदामेंदा झाला. तर पुढील अपघातात आणखी दोन जणांना गंभीर दुखापती झाल्या.

अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही गंभीर जखमा होऊन ते जागेवरच बेशुद्ध पडले. नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेत त्यांना उपचारांसाठी राजगुरुनगर येथील रुग्णालयात दाखल केले.मात्र त्यांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती नागरिकांनी दिली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने राजगुरुनगर शहर व सातकरस्थळ परिसरात खळबळ उडाली.

अनेक युवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी मदत केली. रस्त्यावर पडलेल्या दुचाकी बाजुला केल्या. कार चालक डॉक्टर असल्याचे बोलले जात असून शहरातील एका मोठ्या रुग्णालयाचा संचालक असल्याचे सांगण्यात येत आले. 

Web Title: pune accident news terrible accident in Rajgurunagar A reckless car driver hit three two-wheelers and six to seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.