Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:55 IST2025-05-12T18:53:00+5:302025-05-12T18:55:57+5:30
एका १८ वर्षीय तरुणीच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी २४ तासातच आरोपी शोधून काढला. तरुणीची हत्या करणारा शेजारीच निघाला.

Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
Pimpri chinchwad crime: पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री भररस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, यात ती गतप्राण झाली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू केला. यात शेजाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची रविवारी (११ मे) रात्री हत्या करण्यात आली होती. कोमल जाधव ही पिंपरी चिंचवडला लागून असलेल्या वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे.
कोमलची कशी केली हत्या?
रविवारी कोमल घरात होती. त्यावेळी बाईकवरून दोन जण आले. त्यांनी तिला घराबाहेर बोलावून घेतले. कोमल घरातून बाहेर आली. ती समोर येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला.
शेजाऱ्यानेच केली हत्या, कारण काय?
हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यात पोलिसांना २४ तासातच यश आले.
कोमल जाधवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ४५ वर्षीय उदयभान यादव (मुख्य आरोपी) आणि त्याचा सख्खा भाचा अशा दोघांना अटक केली. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
वाचा >>'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्याचबरोबर दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केली.