जैन बोर्डिंगची जागा देण्याच्या निर्णयाला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:37 IST2025-10-17T16:36:26+5:302025-10-17T16:37:56+5:30
अल्पसंख्याक समाज असल्याने त्यांच्यावर काही अन्याय केला, त्यांच्या मालमत्ता हडप केली तरी कोणी विचारणार नाही असा सरकारचा समज आहे

जैन बोर्डिंगची जागा देण्याच्या निर्णयाला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुणे : मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असल्याचा आरोप करत या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध केला आहे. यासाठी समाजाने शुक्रवारी (दि. १७) जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेष ऋषिजी, माताजी महाराज हे मुनीगण होते. शेतकरी पक्षाचे नेते, राजू शेट्टी काँग्रेसचे नेते अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहाध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (ठाकरे गटाचे) संजय मोरे उपस्थित होते. तसेच आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल, ॲड. योगेश पांडे, ॲड. स्वप्नील बाफना, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, ॲड. जिंतूरकर, अक्षय जैन सहभागी झाले होते.
ही जमीन विक्री बेकायदा असून त्याविरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यायचा आहे, असे आवाहन आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज यांनी केले. शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या ताब्यातील भूखंडाबाबत काही व्यक्तींमार्फत विकासकांशी व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा विक्रीकरार आणि त्यानंतरचा कर्जकरार रद्द करावा आणि वसतिगृहाची मालमत्ता वसतिगृह आणि ट्रस्टच्या संबंधित धर्मादाय कारणांसाठीच वापरली जावी, अशी समाजाची मागणी आहे. यावेळी शेट्टी म्हणाले, “अल्पसंख्याक समाज असल्याने त्यांच्यावर काही अन्याय केला, त्यांच्या मालमत्ता हडप केली तरी कोणी विचारणार नाही असा समज आहे. काही ट्रस्टना बंदुकीचा धाक दाखवला असेल. ईडीची भीती दाखवली असेल त्यामुळे त्यांनी जागा विकासकाला देण्याची तयारी दाखवली असेल.”
याप्रकरणी लक्ष्मीकांत खाबिया, ॲड. योगेश पांडे आणि आनंद कांकरिया यांनी गुरुवारी (दि. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला वसतिगृह आणि मंदिराविषयी समाजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, असे खाबिया यांनी सांगितले.