आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; आनंदनगर भागात तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:03 IST2026-01-08T16:03:08+5:302026-01-08T16:03:34+5:30
आयुर्वेदिक उपचार केंद्रात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली असता बनावट ग्राहक पाठवून खात्री केली होती

आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; आनंदनगर भागात तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने तिघांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी एका विधिसंघर्षग्रस्त मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा चालक विद्या मदन मंडले (रा. कात्रज), प्रमोद बबन खाटपे (रा. आंबेगाव) यांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार इम्रान खान नदाफ यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. ६) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोकड, मोबाइल आणि इतर साहित्य असा २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिंहगड रोड, आनंद नगर परिसरातील मनाली आयुर्वेदिक उपचार केंद्रात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे पोलिस कर्मचारी ईश्वर आंधळे, बबन केदार, किशोर भुजबळ, वैशाली खेडेकर यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. आरोपी पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते. यावेळी स्पा मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात असून, अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.