PDCC: मार्च अखेर कोट्यवधींचा नफा; आता पैशांचा तुटवडा, पुणे जिल्हा बँकेची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:28 IST2025-05-09T11:28:02+5:302025-05-09T11:28:36+5:30
जिल्हाभरातील सर्व शाखांमध्ये शेतकरी तसेच इतर खातेदारकांना १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळत नसल्याने सर्व हैराण झाले आहेत

PDCC: मार्च अखेर कोट्यवधींचा नफा; आता पैशांचा तुटवडा, पुणे जिल्हा बँकेची अवस्था
शिरूर : शिरूरसह जिल्हाभरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शाखांमध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ऐन लग्नसराईत सभासदांना आवश्यक तेवढे पैसे मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.
नुकताच मार्च एन्ड पार पडला असून, जिल्हा बँकेला कोट्यवधी रुपयांचा नफा झाल्याचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. असे असताना महिनाभरापासून जिल्हा बँकेत पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी जिल्हाभरातील सर्व शाखांमध्ये शेतकरी तसेच इतर खातेदारकांना १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळत नसल्याने सर्व हैराण झाले आहेत. जिल्हा बँकेला संलग्न असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या शेतकरी सभासदांनी मार्चअखेर आपापले सर्व कर्ज भरले आहे, तर एप्रिलपासून पुन्हा कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर वाटप झालेल्या कर्जाची लाखो रुपयांची रक्कम जमा झाली आहे. परंतु, यातील १० हजारपेक्षा अधिक रक्कम काढता येत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसने पैसे घेऊन कर्ज भरले आहे. परंतु, पुन्हा जादा पैसे मिळत नसल्याने लोकांचे पैसे परत करता येत नाहीत. काही शेतकरी, सभासद यांच्या मुला - मुलींची लग्न होत आहेत. परंतु, जिल्हा बँकेतून पैसे मिळत नसल्याने त्यांची लग्न कशी करणार, असा यक्ष प्रश्न सभासद शेतकऱ्यांपुढे उभा आहे.
जिल्हा बँकेत निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा व आवश्यक तेवढी रक्कम उपलब्ध करावी, अशी मागणी सभासद शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा बँकेच्या स्थानिक शाखांमधील शाखा व्यवस्थापकांना विचारले असता तालुक्याच्या मुख्य शाखेकडून कमी पैसे उपलब्ध होत आहेत. तसेच प्रतिखातेदार १० ते ३० हजारपेक्षा अधिक रक्कम न देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.