पुण्यात पॅलेस्टाईन समर्थक अन् हिंदुत्ववादी भिडले; दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:27 IST2025-05-13T17:26:43+5:302025-05-13T17:27:51+5:30

कर्वेनगर परिसरातील डोमिनोज पिझ्झा आउटलेट परिसरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रकं वाटप करून आंदोलन केलं होतं

Pro-Palestinian and Hindutva supporters clash in Pune; Cases registered against both groups. | पुण्यात पॅलेस्टाईन समर्थक अन् हिंदुत्ववादी भिडले; दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल..

पुण्यात पॅलेस्टाईन समर्थक अन् हिंदुत्ववादी भिडले; दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल..

किरण शिंदे 

पुणे: पुण्यातील कर्वेनगर परिसरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या बीडीएस (बॉयकॉट, डीवेस्टमेंट, सँक्शन्स) चळवळीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार ८ मे रोजी घडला होता. पुण्यात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून दोन गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडीएस चळवळीचे कार्यकर्ते स्वप्नजा लिमकर, सस्मित राव, कमल शाह, ललिता तंगीराला यांच्यासह काहींनी कर्वेनगर परिसरातील डोमिनोज पिझ्झा आउटलेट परिसरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रकं वाटप करून आंदोलन केलं होतं. मात्र या आंदोलनाची माहिती काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी कर्वेनगर परिसरात धाव घेत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन गटात वादावादी झाली होती. आणि वादावादीच रुपांतर शेवटी हाणामारीत झालं होतं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. 

बीडीएस संघटनेच्या कार्यकर्त्या स्वप्नजा लिमकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आंदोलनादरम्यान जमावाने त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून महेश पावळे, सागर धामे, अमित जाधव व इतरांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 71, 189(2), 190, 191(2), 115(2), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, बीडीएस चळवळीच्या कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पॅलेस्टाईन समर्थक कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून ज्यू धर्मीयांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केली.  ज्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यांनी हमाससारख्या संघटनांच्या विचारांना समर्थन देणारे पोस्टर्सही वाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 196, 299, 302, 189(2), 190, 126(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी  दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे अधिक तपास केला जात आहे.

Web Title: Pro-Palestinian and Hindutva supporters clash in Pune; Cases registered against both groups.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.