खासगी सोसायट्यांकडून पाण्याचा पुनर्वापरच होत नाही; पुणे महापालिका आखणार पाण्याच्या पुनर्वापरासाठी नवे धोरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:23 IST2025-09-25T13:21:59+5:302025-09-25T13:23:06+5:30
हे धोरण तयार झाल्यानंतर १.५ टीएमसी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन मलनि:स्सारण विभागाने केले आहे

खासगी सोसायट्यांकडून पाण्याचा पुनर्वापरच होत नाही; पुणे महापालिका आखणार पाण्याच्या पुनर्वापरासाठी नवे धोरण
हिरा सरवदे
पुणे : खासगी सोसायट्या व प्रकल्पांनी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक सोसायट्या व प्रकल्प या नियमाचा भंग करून पाण्याचा पुनर्वापर करणे टाळतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून याबाबत धोरण निश्चित करण्यात येत आहे. हे धोरण तयार झाल्यानंतर १.५ टीएमसी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन मलनि:स्सारण विभागाने केले आहे.
पाणी उचलण्यावरून आणि पाण्याच्या बिलावरून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहेत. महापालिका मंजूर काेट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहे, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करत नाही, असा आराेप जलसंपदा विभागाकडून केला जातो. शहरातील नागरिकांनी, सोसायट्यांनी व खासगी प्रकल्पांनी पुण्याचा पुनर्वापर केल्यास महापालिकेला धरणातील कमी पाणी उचलावे लागेल, असा विचार वारंवार मांडला जातो.
या अनुषंगाने महापालिकेकडून स्वतःचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) असलेल्या सोसायट्यांना मिळकत करातील सर्वसाधारण करामध्ये ५ टक्के सूट दिली जाते. शिवाय राज्य सरकारच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) नुसार खासगी सोसायट्या व प्रकल्पांना मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. सोसायट्या व खासगी प्रकल्पांनी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बांधकाम, बागकाम, फ्लशिंग व इतर कामासाठी करणे अपेक्षित आहे.
मात्र तंत्रज्ञान, खर्च आणि माहितीच्या अभावामुळे खासगी सोसायट्या एसटीपी प्रकल्प योग्य पद्धतीने चालवत नाहीत. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फ्लशिंगसाठी वापर करत नाहीत. सर्व कामासाठी स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा वापर केला जातो. परिणामी, महापालिकेला पाण्याची तहान भागवण्यासाठी धरणातून जास्तीचे पाणी उचलावे लागते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मलनि:स्सारण विभागाने पाण्याच्या पुनर्वापरासाठी नवीन धोरण तयार करण्याचे नियोजन केले आहे. हे धोरण तयार झाल्यानंतर १.५ टीएमसी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन आहे.
महापालिकेची मैलापाणी शुद्धीकरणासाठी असलेली यंत्रणा व नियोजन
- महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पांची संख्या - ९
- जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांची संख्या - ११
- अमृत २ अंतर्गत नूतनीकरण करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची संख्या - ६
- समाविष्ट ११ गावांसाठी प्रस्तावित एसटीपी - १
- समाविष्ट २१ गावांसाठी प्रस्तावित एसटीपी - ८
- रामटेकडी येथे नव्याने बांधण्यात येत असलेला एसटीपी प्रकल्प - १
- फ्लशिंग व बागकामासाठी पाण्याचा अपेक्षित पुनर्वापर प्रतिव्यक्ती ४५ लिटर
महापालिकेने खासगी बांधकाम व उद्यानासाठी टँकरद्वारे पुरवलेले पाणी
- वर्ष २०२२-२३ - १०२.७० मिली लिटर
- वर्ष २०२३-२४ - १८५.८२ मिली लिटर
- वर्ष २०२४-२५ - २०५.५४ मिली लिटर
अमृत २ अंतर्गत नूतनीकरण केल्यानंतर किती क्षमता वाढणार?
१) भैरोबा केंद्र - १३० एमएलडीवरून २०० एमएलडी
२) तानाजीवाडी केंद्र - १७ एमएलडीवरून २६ एमएलडी
३) बोपोडी केंद्र - १८ एमएलडीवरून २८ एमएलडी
४) एरंडवणे केंद्र - ५० एमएलडी (क्षमता जैसे थे, पण तंत्रज्ञान नूतनीकरण)
५) विठ्ठलवाडी केंद्र - ३२ एमएलडी (नूतनीकरणानंतर क्षमता राहणार पूर्वीप्रमाणेच)
६) नवीन नायडू केंद्र - ११५ एमएलडी (नूतनीकरणानंतर जैसे थे)