विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:24 IST2025-07-14T12:23:54+5:302025-07-14T12:24:28+5:30
महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालली आहे

विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन
निमगाव केतकी (इंदापूर) : नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात राज्याचे माजी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी रविवारी पान बाजाराला भेट दिली. पानमळे धारक, व्यापारी ,शेतकऱ्यांशी संवाद साधत सध्या पानाचे दर पडले असून सहा हजार पानांना केवळ अडीचशे रुपये येत आहेत. त्यामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याने यावर मार्ग काढावा अशी विनंती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनी वरून संवाद साधला यावेळी कोकाटे यांनी देखील लवकरच आपण यावर मार्ग काढू असे आश्वासित केले.
रविवारी १३ जुलै रोजी माजी मंत्री,आमदार जानकर यांनी विड्याच्या पानांचा बाजार दर रविवारी आणि बुधवारी भरत असलेल्या निमगाव केतकी ग्रामपंचायत समोरून पान बाजारात भेट दिली. यावेळी पान उत्पादक मळेकरी व विक्रेते ब्रह्मदेव शेंडे, गोरख आदलिंग यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालली आहे. पिकवतो त्याला दाम मिळत नाही. गुटखा, मावा, मसाला आदी चैनीच्या वस्तू बाजारात सर्रास विकल्या जातात. यावर शासनाचे निर्बंध आणखी कडक केले पाहिजेत. मात्र आयुर्वेदात उल्लेख असलेले शरीरास पचन क्रियेसाठी रक्त शुद्धी व वाढीसाठी बहुउपयोगी असलेले पान टपरीवर महाग विकत असले तरी प्रत्यक्षात पिकवणाऱ्याला अत्यंत कमी पैसे मिळत आहेत. पानमळ्यामध्यातून ग्राहकाच्या हातात येई पर्यंतच्या प्रवासात पान उत्पादकांना मोठा खर्च सोसावा लागतो. सध्या फापडा सेज (कळी) गबाळ या पानांचे दर गडगडले असून सहा हजार पानांच्या डागाला केवळ अडीचशे रुपये मिळत आहेत.
आमदार महादेव जानकर यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनी वरून संवाद साधत शेतकऱ्यांची कैफियत सांगून खाण्याच्या पानाला दर्जा मिळावा. तसेच तो पिकवणाऱ्या मळेधारकांना चार पैसे राहावे. अशा पद्धतीने ठोस उपाययोजना शासन स्तरावर करावी अशी मागणी केली. यावर मंत्री कोकाटे यांनी देखील लवकरच यात मार्ग काढणार असल्याचे आश्र्वासित केले.