कुजलेल्या अवस्थेत ओढ्यात गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसरातील धक्कादायक घटना, हातावर 'रविराज' टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:01 IST2025-10-23T13:00:52+5:302025-10-23T13:01:19+5:30
मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे

कुजलेल्या अवस्थेत ओढ्यात गरोदर महिलेचा मृतदेह; भिगवण परिसरातील धक्कादायक घटना, हातावर 'रविराज' टॅटू
भिगवण: बारामती- अहिल्यानगर रोडवरील (मदनवाडी ता.इंदापूर) गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने भिगवण परिसरात खळबळ उडाली आहे. चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिक थरारून गेले. खून करून हा मृतदेह ओढ्यात फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने दौंड–भिगवण परिसर हादरला असून, पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला अंदाजे 25 ते 30 वर्षांची असून, तिच्या डाव्या हातावर “रविराज” असा टॅटू आढळून आला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, ती सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार बारामती, भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी पुलाखाली उघडकीस आला. स्थानिकांना दुर्गंधी जाणवल्यानंतर त्यांनी पुलाखालून पाहणी केली असता चादरीत गुंडाळलेला मृतदेह दिसला. तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार मृतदेहाला सुमारे पाच ते सहा दिवस झाले असावेत. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास भिगवण पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे यांनी केले.