जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार ‘बाळंतविडा’ किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:30+5:302021-02-05T05:03:30+5:30

सुषमा नेहरकर-शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना गरोदरपणात व प्रसुती झाल्यानंतर पोषण आहार ...

Pregnant mothers in the district will get 'Balantvida' kit | जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार ‘बाळंतविडा’ किट

जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार ‘बाळंतविडा’ किट

सुषमा नेहरकर-शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना गरोदरपणात व प्रसुती झाल्यानंतर पोषण आहार न मिळाल्याने कुपोषित बालकांचा जन्म होतो. हे टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व प्रसुतीच्या उंबरठ्यावर असलेल्या व प्रसुती झालेल्या स्तनन मातांना काळी खारीक, सेंद्रिय गूळ, काजू, शुध्द गाईचे तुप असा विविध पौष्टिक साहित्यांचा ‘बाळंतविडा’ किट देणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. यात गरोदर मातांची नियमित तपासणी पासून विविध आवश्यक गोळ्या औषधे देणे, कडधान्य पुरवणे आदी उपक्रम राबवितात. एवढी काळजी घेऊन देखील जिल्ह्यातील काही तालुक्यातील कुपोषण कमी होताना दिसत नाही. पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गरोदर माता व प्रसुती झालेल्या मातांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी ‘बाळंतविडा’ ही योजना घेतली आहे. यासाठी तब्बल १ कोटी २५ लाखांचा निधी खर्च करणार आहे. यात सर्वसाधारण गटातील महिलांसाठी ७५ लाख रुपये व मागासवर्गीय गटातील महिलांसाठी ५० लाख राखीव ठेवणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवित असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.

--

कुपोषण कमी करणे हाच मुख्य उद्देश

जिल्ह्यातील बालकांमध्ये आजही कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. यात केवळ दुर्गम, आदिवासी भागातील बालकेच नव्हे तर सधन तालुक्यात देखील हे प्रमाण जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गरोदर महिलांना ‘बाळंतविडा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

- पूजा पारगे, सभापती महिला व बालकल्याण विभाग

--

‘बाळंतविडा’ किटमध्ये काय-काय असणार

- काळी खारीक

- सेंद्रिय गूळ

- खोबरे

- गाईचे शुध्द तूप

- काजू

- शेंगदाणे

- भाजकी डाळ

- डिंक

Web Title: Pregnant mothers in the district will get 'Balantvida' kit