६ महिन्यांपासून साईड बिझनेसचा प्रताप; मुंबईहून पुण्यात विक्री, रिक्षाचालकाकडून ६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:49 IST2025-12-01T13:47:59+5:302025-12-01T13:49:52+5:30
रिक्षाचालकाकडून ६ लाखांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तो मुंबईहून मेफेड्रोन (एमडी) घेऊन येऊन पुण्यात त्याची किरकोळ विक्री करत होता

६ महिन्यांपासून साईड बिझनेसचा प्रताप; मुंबईहून पुण्यात विक्री, रिक्षाचालकाकडून ६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त
पुणे: गंगाधाम चौकाकडून पासलकर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद थांबलेल्या रिक्षाचालकाला पकडून अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्याकडून ६ लाख १८ हजार रुपयांचे ३० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. अदिल करीम बागवान (३५, रा. पानसेरनगर, येवलेवाडी) असे या रिक्षाचालकाने नाव आहे. अदिल बागवान हा रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करतो. तो मुंबईहून मेफेड्रोन (एमडी) घेऊन येऊन पुण्यात त्याची किरकोळ विक्री करत होता.
गेल्या सहा महिन्यांपासून त्याने हा साईड बिझनेस सुरू केला होता. शेवटी तो पोलिसांना नजरेला आला. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार तसेच बिबवेवाडी पोलिस ठाण्याकडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे २९ नोव्हेंबर रोजी गस्तीवर होते. त्यावेळी गंगाधाम चौकाकडून पासलकर चौकाकडे येणाऱ्या रोडवर महावीर मोटर्ससमोर रोडवर एक रिक्षाचालकाने रिक्षा पार्क केली होती. तो सतत खाली उतरून इकडे-तिकडे संशयितरीत्या कोणाची तरी वाट पाहात होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस त्याच्या दिशेने जाऊ लागले. ते पाहून तो तेथून पळून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला.
पोलिसांनी या रिक्षाचालकाला पकडले. विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव अदिल बागवान असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६ लाख १८ हजार रुपयांचा ३० ग्रॅम ९० मिलिग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. त्याबरोबर १ लाखाची रिक्षा आणि १० हजारांचा मोबाइल असा एकूण ७ लाख २८ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलिस अंमलदार संदीप शिर्के, अमोल सरडे, सचिन मावळे, दया तेलंगे पाटील, विठ्ठल साळुंखे, नीलेश जाधव, रिहान पठाण, आशा भिंगारे, बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विद्या सावंत, पोलिस अंमलदार गायकवाड, येवले यांनी केली आहे.