खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी खेवलकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 12:44 IST2025-08-17T12:43:40+5:302025-08-17T12:44:06+5:30
आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का पॉट, दहा मोबाइल, सुगंधी तंबाखू, दोन कार, दारूच्या बाटल्या, असा मुद्देमाल जप्त

खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी खेवलकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : खराडी पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकर याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात शुक्रवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. खराडी येथील एका हॉटेलमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला होता.
या प्रकरणात डॉ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग आणि प्राची गोपाल शर्मा यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का पॉट, दहा मोबाइल, सुगंधी तंबाखू, दोन कार, दारूच्या बाटल्या, असा मुद्देमाल जप्त केला गेला होता.
या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. खराडीतील हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीपूर्वी आरोपींनी अशाच प्रकारच्या पार्टीचे आयोजन एप्रिल आणि मे महिन्यांत केले असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाइलमधून महिलांशी झालेला संवाद, पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ मिळाले असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.
खेवलकर याच्याविरुद्ध एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. खेवलकर याने खराडीतील हॉटेलमध्ये यापूर्वीही पार्टी आयोजित केली होती, ज्यात तरुणींना बोलवले गेले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संबंधित संस्थेने केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना नुकतेच दिले आहेत.
सहा आरोपींचे मोबाइल आणि पेन ड्राइव्ह जप्त
या प्रकरणात पोलिसांनी डॉ. खेवलकर याचा दुसरा मोबाइल, कॅमेरा आणि लॅपटॉप जप्त केला आहे. तसेच, संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासली असून, डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. उर्वरित सहा आरोपींचे मोबाइल आणि पेन ड्राइव्ह जप्त झाल्याची माहिती आहे. त्यानुसार पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे.
या प्रकरणात एका महिलेने 3 नुकतीच सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, २०२२ ते जून २०२५ या कालावधीत डॉ. खेवलकर यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून तिचे निर्वस्त्र अवस्थेतील फोटो काढले असून, महिला याला संमती देत नव्हती. या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचीही हरकत महिला स्लॉट्सने दाखवली आहे.
यानंतर सायबर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ७७, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (ई) अंतर्गत डॉ. खेवलकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सायबर पोलिसांकडून प्रकरणाचा चौकशी करीत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.