सत्ता येते आणि जाते; मात्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे पद - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:27 IST2025-11-24T13:26:52+5:302025-11-24T13:27:51+5:30
निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतली असल्याने, समविचारी पक्षासोबत युती करून टाका असे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिले.

सत्ता येते आणि जाते; मात्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे पद - एकनाथ शिंदे
फुरसुंगी : सत्ता येते आणि सत्ता जाते. मात्र मला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे सगळ्या पदांपेक्षा मोठे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची मनात असलेली खदखद रविवारी (दि. २३) फुरसुंगी येथे बोलून दाखवली.
फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी शिवसेना उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले की, आपण मुख्यमंत्री झाल्यावर फुरसुंगी-उरुळी गाव येथील महापालिकेच्या अवाजवी करामुळे नगरपरिषद करण्यात आले. अडीच वर्षांच्या कालावधीत बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली. मी टीकेला टिकेतून उत्तर न देता कामातून उत्तर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावे पुणे महानगरपालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतला. आमदार विजयबापू शिवतारे यांनी त्यासाठी आग्रही मागणी केली होती, कार्यकर्त्यांची ही मागणी पूर्ण करून स्थानिक नागरिकांचा १२ पट कराच्या बोज्यातून आम्ही मुक्तता केली. तसेच या भागाचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. ज्यांनी या दोन्हीला विरोध केला त्यांना आता तुमची मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही, त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. तसेच उर्वरित भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी १०० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यावर नक्की मंजुरी देण्यात येईल असे नमूद केले. फुरसुंगीची भाजी मंडई आणि क्रीडा संकुल देखील आपण मंजूर केले आहे, तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी १०३ कोटी रुपये दिले असल्याचे सांगितले. लवकरात लवकर या नगर परिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास आराखडा अंतिम करावा असेही याप्रसंगी सांगितले.
समविचारी पक्षासोबत युती करा
लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण एकत्र लढलो असल्याने व भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने माघार घेतली असल्याने, समविचारी पक्षासोबत युती करून टाका असे निर्देश यावेळी दिले.