प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बडगा

By श्रीकिशन काळे | Published: March 19, 2024 03:11 PM2024-03-19T15:11:06+5:302024-03-19T15:12:43+5:30

सध्या या प्लांटमुळे अधिक प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून खूप तक्रारी ‘एमपीसीबी’कडे येत आहेत....

Polluting ready mix concrete plant closed, pollution control board warns | प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बडगा

प्रदूषण करणारे रेडी मिक्स काँक्रीट प्लांट केले बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बडगा

पुणे : बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक ॲक्शन घेतली असून, ज्या प्लांटमुळे प्रदूषण होतेय आणि नियमांचे उल्लंघन होत आहे, असे सांत प्लांट बंद करण्याचा आदेश ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिले आहेत. पुण्यात देखील त्याविषयी सर्व्हेक्षण सुरू असून, इथेही कारवाई केली जाणार आहे.

सध्या या प्लांटमुळे अधिक प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून खूप तक्रारी ‘एमपीसीबी’कडे येत आहेत. या तक्रारींवरूनच १ मार्चपासून पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमांचे पालन केले नसेल त्या ठिकाणी अधिकारी लगेच नोटीस बजावत आहेत. काही अटी पाळल्या नसतील तर त्यांना नोटीस देऊन त्यात सुधारणा करण्यासाठी वेळ देखील दिला जात असल्याचे आंधळे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे, मारूंजी, नांदे या ठिकाणचे प्लांट बंद पाडण्यात आले आहेत. नांदे गावातील एका प्लांटला बंद करण्याची नोटीस दिली आहे. तर मारुंजी येथील सहा प्लांटचे काम याअगोदरच बंद करण्यात आले आहे, असेही आंधळे म्हणाले. सध्या पुण्यातील व पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता पातळी ढासळलेली आहे. शंभरहून अधिक एअर क्वालिटी इंडेक्स नोंदवला जात आहे. त्यात रेडी मिक्स प्लांटचा अधिक वाटा आहे.

हे उपाय आवश्यक?

कोणत्याही ठिकाणी बांधकाम करताना त्या जागेभोवती सुरक्षा कवच लावणे आवश्यक असते. जेणेकरून आजुबाजूला धूळ जाणार नाही. नागरिकांना त्रास होणार नाही. नियमानूसार बॅरीकेट किमान ५ फूट आणि अधिकाधिक २० फूटांचा असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा मारा करावा, जेणेकरून धूळ पसरणार नाही.

रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना फिल्डवर पाठवले. ज्यांनी नियमावली पाळली नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. सात प्लांट पूर्णपणे बंद करायला सांगितले आहेत. तर ज्यांच्याकडे सुधारणा आवश्यक आहेत, त्यांना नोटीसा दिल्या आहेत. कारण काम बंद पाडणे हा आमचा हेतू नाही. परंतु, नियमानूसार काम व्हावे. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही ॲक्शन घेत आहोत. अनेक प्लांटने तर परवानगीच घेतली नव्हती. त्यांना ते काम बंद करायला सांगितले.

- रवींद्र आंधळे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे

Web Title: Polluting ready mix concrete plant closed, pollution control board warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.