पार्थिव घेऊन जाणारी पीएमपीची ‘पुष्पक सेवा’ अचानक बंद; गरजूंना घ्यावा लागतोय रुग्णवाहिकेचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:20 IST2025-09-09T16:19:47+5:302025-09-09T16:20:14+5:30
पुष्पक वाहिनेची दर एकेरी फेरीसाठी ३०० रुपये, तर दुहेरीसाठी ६०० रुपये इतके किरकोळ होते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना पार्थिव नेण्यासाठी ही बस सोयीची आणि परवडणारी होती

पार्थिव घेऊन जाणारी पीएमपीची ‘पुष्पक सेवा’ अचानक बंद; गरजूंना घ्यावा लागतोय रुग्णवाहिकेचा आधार
पुणे: सर्वसामान्यांना परवडणारी आणि कमी दरात सुरू असलेली पीएमपीची शववाहिनी ‘पुष्पक सेवा’ पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अचानक बंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा बंद झाल्यामुळे गरजूंना पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका, इतर वाहने शोधावी लागत आहे. त्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पार्थिव स्मशानभूमीपर्यंत कमी खर्चात पाेहोचविण्यासाठी आणि सामाजिक हेतूने २४ वर्षांपासून ‘पुष्पक सेवा’ सुरू होती. या सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत होता. पीएमपीकडून पुष्पक सेवेसाठी असलेल्या बसच्या रचनेत बदल करून पार्थिव नेण्यासाठी खास बस तयार केली होती. पुष्पक वाहिनेची दर एकेरी फेरीसाठी ३०० रुपये, तर दुहेरीसाठी ६०० रुपये इतके किरकोळ होते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना पार्थिव नेण्यासाठी ही बस सोयीची आणि परवडणारी होती. काही वर्षांपूर्वी पीएमपीकडे चार पुष्पक सेवा देण्यासाठी बस होत्या. त्यापैकी एक बस पिंपरी-चिंचवड शहरासाठी देण्यात आली. तर, तीन बस पुण्यात चालविल्या जात होत्या. पण, नंतर त्या बस कमी होत गेल्या. गेल्या एक ते दीड वर्षापासून तर फक्त एकच पुष्पक सेवा देणारी बस होती. या बसला नागरिकांकडून कायम मागणी होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पीएमपीनेदेखील बस बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा फटका बसत असून, ही सेवा पीएमपीने सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
पुष्पक सेवा बंदचा निर्णय चुकीचा
पीएमपी ताफ्यात बसची संख्या कमी असल्याचे कारण देऊन प्रशासनाने दीड वर्षापूर्वी पुष्पक सेवेतील बसच्या संख्या कमी केल्या होत्या. तसेच दोन बसमध्ये बदल करून त्या पुन्हा प्रवासी सेवेत वापरण्यात येत होत्या. आता पीएमपीच्या ताफ्यात बसची संख्या वाढली आहे. पुढील काही महिन्यांत नव्या बस येणार आहेत. तरीही बस कमी असल्याचे कारण देत सेवा बंद केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवा ही सेवा असते, त्याठिकाणी व्यावसायिक भूमिकेची अंमलबजावणी करणे चुकीचे आहे.
अध्यक्षांसोबत शिष्टमंडळाची वादावादी
पीएमपीची पुष्पक बससेवा सुरू करण्यात यावी, यासाठी शिवेसना (उबाठा)च्या पदाधिकाऱ्यांनी पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांची सोमवारी भेट घेतली. त्यावेळी पीएमपीचे अध्यक्ष आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणला, असे अध्यक्षांनी सुनावले. पुष्पक सेवा पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेकडून दिला आहे.
पुष्पक वाहिनीचे एकेरी दर - ३००
पुष्पक वाहिनीचे दुहेरी दर - ६००