कर्वे रोडवर पीएमपी बसची रिक्षाला धडक; भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा, ३ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:16 IST2025-12-09T15:14:50+5:302025-12-09T15:16:20+5:30
अपघातात रिक्षाचा चुराडा झाला असून घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पीएमपी बसचालकाला चोप दिला

कर्वे रोडवर पीएमपी बसची रिक्षाला धडक; भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा, ३ जण गंभीर जखमी
पुणे: पुण्याच्या कर्वे रस्त्यावर नळस्टॉप चौकातील पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास पीएमपी बसने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, रिक्षा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जवळील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावर नळस्टॉप जवळील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे. नळस्टॉप चौक अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या चौकात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. आज दुपारी अडीचच्या सुमारास कोथरूड वरून कात्रजकडे जाणाऱ्या बसने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेची भीषणता इतकी तीव्र होती की, रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसून आले आहे. अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पीएमपी बसचालकाला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.