PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:43 IST2025-12-17T11:42:27+5:302025-12-17T11:43:39+5:30
- बारामती होस्टेलवरून सलग १२ तास चर्चा, मॅरेथॉन बैठका, पक्ष प्रवेशाचा सपाटा

PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर
पुणे :पुणे आणि पिंपरी-चिचंवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या गडासाठी कंबर कसली आहे. सेनापती बापट रस्त्यापासून जवळ असलेल्या बारामती होस्टेलवरून निवडणुकीची सूत्रे हलविण्यास सुरवात केली आहे.
पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे पदाधिकारी, इच्छुक यांच्यासह पुण्याचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केली. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या बैठकीचे सत्र रात्री ७ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे बारामती हॉस्टेलला वॉर रूमचे स्वरूप आले होते.
पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्किट हाउसकडे न जाता थेट बारामती होस्टेलवर गेले.
त्यानंतर सांगलीतील काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अजित पवार यांनी चर्चा करून रात्री साडेदहाच्या सुमारास बारामती होस्टेल सोडले. जिजाई बंगल्यावर मुक्कामी गेले.
अजित पवार मंगळवारी सकाळी ७ वाजता पुन्हा बारामती होस्टेलवर दाखल झाले. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रभागनिहाय आढावा घेतला. पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पूर्वभागाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रूपाली पाटील-ठोंबरे, अक्रूर कुदळे यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पश्चिम भागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप हे बाहेरगावी होते. त्यामुळे ते यावेळी गैरहजर होते.
माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा अजित पवार गटात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पूर्वभागाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, शशिकांत टिंगरे, सुरेश टिंगरे, गणेश खांदवे, बंटी खांदवे आदी उपस्थित होते.