कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:01 IST2025-06-07T13:56:53+5:302025-06-07T14:01:09+5:30

संबंधित संशयित वकील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Pistol displayed in land dispute in Kasarsai; Police begin investigation | कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू

कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू

पिंपरी : वादातील जमीन पाहण्यासाठी गेलेल्यांना रोखताना एकाने थेट पिस्तूल बाहेर काढल्याचा प्रकार हिंजवडीलगतच्या कासारसाई येथे शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडला. संबंधित संशयित वकील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भोईर असे पिस्तूल दाखविणाऱ्या वकिलांचे नाव आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलाणी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहे. मुलाणी यांची काही जमीन वाडकर यांनी खरेदी केली आहे. मात्र ही जमीन कुळकायद्यात मोडत असल्याने यासाठी गेल्या १० ते १२ वर्षांपासून वाद सुरू असून, तो वाद न्यायालयात गेला आहे. अशातच शुक्रवारी (दि. ६) दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर आणि त्यांच्यासोबत चौघेजण चारचाकी गाड्या घेऊन कासारसाईत गेले. ते वादग्रस्त जमिनीच्या दिशेने निघाले असता मुलाणी कुटुंबात आणि त्यांच्यात वाद झाले.

मुलाणी कुटुंबाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाचाबाची झाली. याच वादात वकील भोईर यांनी कंबरेचे पिस्तूल बाहेर काढले. तेव्हा मुलाणी कुटुंबीय आक्रमक झाले. हे पाहून वकील भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस घटनास्थळी गेले. याबाबत चौकशी करून पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Web Title: Pistol displayed in land dispute in Kasarsai; Police begin investigation