पुण्यात गुलाबी थंडीचा कडाका; नागरिकांची स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:29 IST2025-11-11T11:07:41+5:302025-11-11T11:29:45+5:30
सोमवारी या हंगामातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील २ दिवस तापमानात अजून घट होणार असल्याचा अंदाज

पुण्यात गुलाबी थंडीचा कडाका; नागरिकांची स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरूवात
पुणे : शहरात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात घट झाली असून, या हंगामातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमानात अजून घट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
राज्यातही ९.५ अंश सेल्सिअस सर्वाधिक नीचांकी तापमानाची जळगावमध्ये नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळेस हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी स्वेटर, मफलरसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार दिवसात तापमानात सहा अंशाने घट झाली आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. सोमवारी देखील पुण्यात पहाटेपासून गारठा वाढला होता. त्यामुळे सकाळी शाळेत जाणारी मुले उबदार कपडे घालूनच घरातून बाहेर पडली. सकाळी दहा वाजेपर्यंत गारवा कायम होता. दुपारी ऊन वाढले, मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तीव्रता कमी जाणवली. रविवारच्या तुलनेत कमाल तापमानात घट होऊन २९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.