बुलेटच्या धडकी भरवणाऱ्या सायलन्सर पोलिसांनी फिरवला बुलडोजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:23 IST2026-02-27T20:22:54+5:302026-02-27T20:23:11+5:30
- वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

बुलेटच्या धडकी भरवणाऱ्या सायलन्सर पोलिसांनी फिरवला बुलडोजर
पिंपरी : शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सर मध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सुमारे ३९१ दुचाकीवर कारवाई करत सायलन्सर वर बुलडोजर फिरवला असून दंड वसूल केला आहे. ही कारवाई वाहतूक पोलिसांनी केली आहे.
वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. २०२५ मध्ये अशा प्रकारच्या १४,५९२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १,५४३ प्रकरणांमध्ये कारवाई करून १८ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, २४ फेब्रुवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत वाहतूक शाखेअंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध वाहतूक विभागांकडून बुलेट सायलन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३६८ बुलेट सायलन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या सायलन्सरसह एकूण ३९१ सायलन्सर निकामी करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावर्कर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. वाहतूक विभागातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई केली. नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.