पेट्रोल पंप मॅनेजरला कोयताचा धाक दाखवून पावणे नऊ लाख लुटले; हडपसरमधील काळे पडळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 22:37 IST2021-06-14T22:34:19+5:302021-06-14T22:37:26+5:30
शनिवार व रविवारी जमा झालेली ८ लाख ७४ हजार २५० रुपयांची रक्कम घेऊन ते बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन सोमवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास जात होते.

पेट्रोल पंप मॅनेजरला कोयताचा धाक दाखवून पावणे नऊ लाख लुटले; हडपसरमधील काळे पडळ येथील घटना
पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात असलेल्या मॅनेजरला दोघा चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवून ८ लाख ७४ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटुन नेली. हा धक्कादायक प्रकार हडपसरमधील काळेपडळ येथील रेल्वे अंडरग्राऊंडकडे जाणार्या रोडवर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
याप्रकरणी बाळासाहेब पंढरी अंभोरे (वय ३६, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आंभोरे हे सय्यदनगर येथील एच पी पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतात. शनिवार व रविवारी जमा झालेली ८ लाख ७४ हजार २५० रुपयांची रक्कम घेऊन ते बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन सोमवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास जात होते. काळेपडळ येथील रेल्वे अंडरग्राऊड रोडने पुढे गेल्यानंतर समोरुन मोपेडवरुन आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी आडवी लावत अडविले. एकाने कोयता भिरकावून मारला. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत आंभोरे यांच्याजवळील रोकड असलेली बॅग घेऊन ते पळून गेले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. फिर्यादीने चोरट्यांचे वर्णन पोलिसांना दिले असून त्यांचा शोध सुरु आहे.