स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:17 IST2025-08-15T12:17:07+5:302025-08-15T12:17:25+5:30
नेहरूंचं भाषण सुरू झालं अन् त्याच वेळी पावसालाही सुरुवात झाली. तरीही नागरिक हलले नाहीत. भर पावसात भिजत पंडित नेहरूंचं रेडिओवरचं भाषण ऐकलं

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण
उद्धव धुमाळे
पुणे : काेल्हापूर संस्थानातील गडहिंग्लज येथे ३१ जुलै १९३५ राेजी माझा जन्म झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी १२ वर्षांचा हाेताे. गावातील माेठी असामी असलेल्या शंकरराव काेरे यांच्याकडे इलेक्ट्रिक रेडिओ हाेता. त्यांचा तीन मजली वाडा. दुसऱ्या मजल्यावर रेडिओ लावलेला. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अर्थात गुरुवारी (दि. १४) दिल्लीत पंडित नेहरू देशाला उद्देशून भाषण करणार आहेत आणि ते आपल्याला ऐकता यावे म्हणून रात्री दहा वाजल्यापासूनच एक एक करून लाेक या वाड्याबाहेर जमली. भाषण इंग्रजीत हाेतं, आवाजही नीट कानावर पडत नव्हता, तरीही लाेक पंडित नेहरूंचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक हाेते. दिल्लीतून स्वातंत्र्याची घाेषणा झाली. नेहरूंचं भाषण सुरू झालं अन् त्याच वेळी पावसालाही सुरुवात झाली. तरीही नागरिक हलले नाहीत. भर पावसात भिजत पंडित नेहरूंचं रेडिओवरचं भाषण ऐकलं. तिरंगा फडकवल्याची घाेषणा हाेताच लाेक अगदी वेड्यासारखं नाचले. साखरेच्या बताशा वाटल्या. हे मी माझ्या डाेळ्यांनी पाहिलं आणि मनात साठवून ठेवलं. ही आठवण सांगत हाेते, वयाची ९० वर्षं पूर्ण केलेले ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डाॅ. शां. ब. मुजुमदार.
देशाला स्वातंत्र्य मिळणार हे जवळपास निश्चित झालेले. त्यामुळे सर्व लाेक अगदी १ ऑगस्टपासूनच दिवस माेजू लागले हाेते. राेजचा दिवस खूप माेठा वाटत हाेता. सर्वच हात स्वातंत्र्याच्या जल्लाेषाची तयारी करण्यात गुंतली हाेती. अखेर १४ ऑगस्ट हा दिवस उजाडला आणि सर्वत्र एकच लगबग सुरू झाली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात गुरुवारी (दि. १४) रात्री जादूची छडी फिरवावी आणि आश्चर्यकारक काही घडावं असंच नागरिक वागत हाेते. त्यांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. भर पावसातही एकसुद्धा माणूस भाषण साेडून घराकडे फिरला नाही. संस्थानिकांच्या दबावात दडलेला आवाज बाहेर निघाला हाेता. स्वातंत्र्य मिळाल्याचा थाट प्रत्येकामध्ये दिसत हाेता. माेकळेपणाने बाेलत हाेता. तत्पूर्वीच शाळा-महाविद्यालयांतून शिक्षकांनी स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला हाेता.
दरम्यान, देशात ब्रिटिश राजवट असली तरी काेल्हापूर परिसरात संस्थानिकांचं राज्य हाेत. त्यावेळचे छत्रपती राजाराम महाराज हाेते. तसा आमचा गडहिंग्लजचा भाग अडगळीत हाेता. सामाजिक-सांस्कृतिक-राजकीयदृष्ट्या नावारूपाला यावं असं काहीच नव्हतं. प्रामुख्याने व्यापारी खिंड हाेती. अशा वातावरणात शालेय शिक्षण गडहिंग्लज येथेच सरकारी शाळेत झाले. देशभर स्वातंत्र्य लढ्याची लाट पसरली हाेती. पण, आम्ही काेल्हापूर संस्थानात हाेताे आणि संस्थानिक इंग्रजधार्जीणे हाेते. तरीही ब्रिटिश सरकारकडून प्रत्येक संस्थानमध्ये एक प्रशासक नेमला जात असे. ताे राजे लाेकांच्या हालचालीवर लक्ष ठेवत असे. तसेच नियंत्रणही करत असे. त्यामुळे ब्रिटिश विराेधी उघडपणे काही घडत नव्हते. काँग्रेसला संस्थानात बंदी हाेती. त्याच काळात प्रजा परिषद हा पक्ष उभा राहिला. आहे ती स्पेस वापरून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती करीत हाेता. तरुणांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा, यासाठी प्रयत्न करीत हाेता. त्यात कार्यरत काहींची नावे आजही आठवतात. त्यामध्ये रत्नाप्पा कुंभार, माधवराव बागल, वसंतराव बागल यांचा समावेश हाेता. खादी वापरा, गांधी टाेपी घाला, असं ही मंडळी सांगत असत. संस्थान स्वतंत्र असल्याने स्वातंत्र्यासाठी आंदाेलन करणे, माेर्चा काढणे, सभा भरवणे, आदी प्रकार उघड-उघड करता येत नसे. त्यामुळे महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, माैलाना आझाद, आदी दिग्गज नेते मंडळीसुद्धा आमच्यापासून जवळच असलेल्या ब्रिटिश राजवटीतील बेळगावला येत. पण काेल्हापूर संस्थानात यापैकी कुणीही आलेले नाही. बेळगाव येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले तेव्हा काेल्हापूर संस्थानातील खूप लाेक तिथे गेले हाेते. त्यात प्रजा परिषदेच्या कार्यकर्त्यांचा माेठा समावेश हाेता.
देशभर पसरलेली असंताेषाची लाट, वाढती तीव्रता लक्षात घेऊन इंग्रजांनीही काढता पाय घ्यायचे निश्चित केले हाेते. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळणार याची सर्वांना कल्पना आलेली; पण स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?, ब्रिटिशांचे सरकार जाणार म्हणजे, आता सत्तेत काेण येणार? याची चर्चा सुरू झाली. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काेल्हापूर संस्थानचे स्टेट्स काय असेल? याबाबत बहुतांश लाेक आपापसात बाेलत हाेते.
विशेष आश्चर्याची गाेष्ट म्हणजे, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काम करणारी प्रजा परिषद स्वातंत्र्यानंतर मात्र काेल्हापूर संस्थानासाठी आग्रही हाेती. त्याचं कारण, काेल्हापूर संस्थान देशातील ५६० संस्थानांपेक्षा वेगळं हाेतं. येथे सामाजिक मूल्यं जपली गेली हाेती. सर्वांना शिक्षणाची दारं खुली झाली हाेती. त्यामुळे येथील लाेक गांधी, नेहरू, पटेल यांच्यापेक्षा शाहू महाराज, राजाराम महाराज, शिवाजी महाराज यांना मानत.