स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:27 IST2025-08-15T12:26:22+5:302025-08-15T12:27:08+5:30
आपला इतिहास समजून घेत, भविष्याच्या दिशेने याेग्य मार्गक्रमण करणे हाच खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखे आहे

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला
उद्धव धुमाळे
पुणे : देश स्वतंत्र होणार आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकणार.. हे निश्चित झाले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच अर्थात गुरुवारी, दि. १४ ऑगस्ट राेजी देशभर जल्लोषाची तयारी केली गेली. सार्वजनिक ठिकाणे विद्युत रोषणाईने सजविली गेली. रेल्वेदेखील त्याला अपवाद नव्हती. घराेघरी सडा-सारवाणी, रांगाेळी आणि गोडधोडाची तयारी झालेली हाेती. माझा मोठा भाऊ श्रीकृष्ण राजूरकर नेमका त्या रात्री रेल्वेने हैदराबादकडे येत होता. ताे सकाळी सकाळी घरी पाेहाेचला आणि स्वातंत्र्याच्या जल्लाेषाचं वर्णन करू लागला. रेल्वे सजवलेली होती... सर्व डब्यांमध्ये एकच चर्चा ती म्हणजे आपल्याला आता स्वातंत्र्य मिळणार... ही चर्चा सुरूच हाेती, रात्रीचे १२ वाजले आणि रेल्वेचा भोंगा जोरात वाजला. एक प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणाच झाली आणि प्रवाशांनी एकच जल्लोष केला... श्रीकृष्ण राजूरकर यांचे बंधू ९६ वर्षीय डॉ. नरसिंह राजूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना हा किस्सा सांगितला.
डॉ. राजूरकर हे उस्मानिया विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक. पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार. पण, निजामशाहीत असल्याने देशाला स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्य वाट्याला आलेले. ना उघडपणे जल्लाेष करता येत, ना अभिमानाने तिरंगा हातात घेऊन फिरता येत. घरी मात्र स्वातंत्र्याचीच चर्चा सुरू हाेती. स्वातंत्र्याचा जल्लोष अनुभवता आला नाही, याचं दु:ख आजही मनात आहे; पण स्वातंत्र्याचा जल्लोष शब्दातून अनुभवता आला. देश स्वतंत्र झाला असला तरी आम्ही निजामी राजवटीत होतो आणि निजामाचा सरदार काशिम रजवी याने संस्थानात थैमान घातले होते. त्याच्या प्रक्षाेभक भाषणाने लाेक त्रस्त हाेते. खुलेआम कत्तली घडत हाेत्या. स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवण्यास मज्जाव करण्यात आला होता. सर्वत्र निजामाचे पिवळे झेंडेच फडकत हाेते. मी अगदी तरुण मुलगा. भावाकडून रेल्वेतील वर्णन ऐकल्यानंतर आसपास कुठे तिरंगा पाहता येईल का, आपल्यालाही तिरंगा फडकवता येईल का, या प्रेरणेने आणि उत्सुकतेने मी त्या दिवशी संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि निराश हाेऊन घरी परतलाे. कारण, कुठेच स्वातंत्र्याची झलक अनुभवायला आली नाही.
डाॅ. राजूरकर सांगत हाेते, माझा जन्म २४ ऑगस्ट १९२९ राेजी झालेला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा दिवसांनी १८ वर्षाचा झालेलाे. माझे वडील निजाम काॅलेजमध्ये कार्यालयीन अधीक्षक हाेते. माझं संपूर्ण शिक्षण हैदराबाद येथेच झालं आणि पुढे राज्यशास्राचा प्राध्यापक म्हणून उस्मानिया युनिव्हर्सिटीत रुजू झालाे. आमचं मूळ गावं लातूर जिल्ह्यातील राजूर. नाेकरी-शिक्षण सर्व हैदराबादला झालं. ‘पीएच.डी’ संशाेधनानिमित्त मला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्याचा याेग आला. दाेन वेळा दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात आणि एक वेळा घरी भेट झाली. सविस्तर चर्चा केली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी सविस्तर दिलं. त्यांच्या साेबत फाेटाेही काढता आला. तेव्हाचे राजकारणी त्यागी, तेजस्वी आणि देशाप्रति समर्पित हाेते. आज आपण समाज म्हणून आदर्श हरवून बसलाे आहाेत. सत्याची सचाेटी, प्रामाणिकता गमावून बसलाे आहाेत. देशाच्या प्रगतीचा पाया पंडित नेहरूंनी घातला. स्वतंत्र भारताच्या विकासाचा राेड मॅप त्यांनी देशाला दिला. पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम उभी राहते, त्याचा प्रत्यय आजही येत आहे. आजवर देशाने केलेली प्रगती, जगात निर्माण केलेले स्थान हे त्याचेच प्रतीक आहे. आपला इतिहास समजून घेत, भविष्याच्या दिशेने याेग्य मार्गक्रमण करणे हाच खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखे आहे.