Nilesh Ghaywal: खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला; गुंड घायवळचा पासपोर्ट होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:45 IST2025-10-04T10:45:11+5:302025-10-04T10:45:33+5:30
नीलेश घायवळने पासपोर्टसाठी नीलेश गायवळ नावाचे आधारकार्ड बनवून त्या नावानेच पासपोर्ट मिळवला असल्याची बाब देखील पोलिस तपासात समोर

Nilesh Ghaywal: खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला; गुंड घायवळचा पासपोर्ट होणार रद्द
पुणे : गुंड नीलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याने दिलेल्या घोषणापत्रात आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. घायवळने खोट्या माहिती आधारे पासपोर्ट मिळवला असल्याने, ही कारवाई केली जाणार आहे. नीलेश घायवळ याने पासपोर्टसाठी नीलेश गायवळ नावाचे आधारकार्ड बनवून त्या नावानेच पासपोर्ट मिळवला असल्याची बाबदेखील पोलिस तपासात समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ३) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. दरम्यान यामुळे घायवळचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर याबाबत कारवाई होऊ शकते.
घायवळने पासपोर्ट काढताना कोथरूड येथील पत्ता दिलेला नाही. त्याने अहिल्यानगरमधील निवासी पत्ता दिला आहे. तसेच नावातदेखील बदल केल्याची काही कागदपत्रे पोलिसांना मिळून आली आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ असे आडनाव लावले आहे. त्यामुळे पासपोर्ट काढताना पोलिस पडताळणीत कदाचित गायवळ आडनाव लावल्यामुळे पोलिसांच्या निदर्शनास त्याचा गुन्हेगारी आलेख आला नसावा असा कयास बांधला जातो आहे. दरम्यान, घायवळने अहिल्यानगर येथील दिलेल्या पत्त्यावर पुणे पोलिसांनी दसऱ्याच्या दिवशी धाड टाकली. यावेळी तो पत्तादेखील खोटा असल्याचे समोर आले. पोलिसांनी याबाबत अहिल्यानगर पोलिसांकडून त्याच्या अनुषंगाने माहिती घेतली. गुरुवारी दिवसभर पुणे पोलिसांची पथके अहिल्यानगर येथे तळ ठोकून होती.
नॉट अव्हॅलेबल असा शेरा दिलेला असतानाही पासपोर्ट मिळाला कसा...
पासपोर्ट काढताना पोलिस व्हेरिफिकेशन केले जाते. नीलेश घायवळ याने नीलेश गायवळ नावाने पासपोर्टसाठी अर्ज करताना जो पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर तो पोलिसांना मिळाला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या कागदपत्रावर ‘नॉट अव्हॅलेबल’ असा शेरा दिला होता. असे असताना पासपोर्ट विभागाकडून पोलिस व्हेरिफिकेशन झालेले नसताना त्याला पासपोर्ट मिळाला कसा हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
कुटुंबीयाचीदेखील चौकशी...
पुणे पोलिसांनी कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर आता नीलेश घायवळच्या कुटुंबीयाची चौकशी सुरू करण्याची तयारी केली आहे. विशेषतः घायवळची पत्नी आणि मुलगा यांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणतेही फेरफार केले का, याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणात खोटा पासपोर्ट मिळवण्याच्या शक्यतेवरुन आणखी एक गुन्हा त्याच्या विरोधात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.