Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
By संतोष कनमुसे | Updated: November 7, 2025 16:01 IST2025-11-07T15:58:28+5:302025-11-07T16:01:20+5:30
Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले.

Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले. अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी चौकशी सुरू असून आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी अमेडिया कंपनीचे रजिस्ट्रेशन केले आहे. या कंपनीकडून खाजगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी या कंपनीने जमिनिची खरेदी करणार होते. कंपनीच्या सहीचे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटील यांना आधीच दिल्याची माहिती समोर आली आहे. सहीचे अधिकार दिग्विजय पाटील यांना देण्याचा २२ एप्रिल २०२५ ला प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाची प्रत समोर आली आहे.
दरम्यान, या व्यवहाराचा दस्त दिग्विजय पाटील यांच्या सहीने झाला आहे. या दस्तामध्ये पार्थ पवार यांनी सहीचे अधिकार दिल्याची प्रत जोडण्यात आली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कारवाईचे आदेश दिले असून अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात तहसीलदार येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.
अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची महार वतनाची ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयांत देण्यात आली. हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आल्याचे समोर आले.
तीनशे कोटींच्या ४० एकर जमीन नोंदणी प्रकरणात सहा कोटी रुपयांचा सेस न घेतल्याबद्दल दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे. दरम्यान, या प्रकरणी फक्त अधिकाऱ्यांनाच बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवारांवर करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
मुंढवा येथील १६.१९ हेक्टर भूखंड खरेदीचा व्यवहार २० मे रोजी झाला. अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपीचे भागीदार दिग्विजय पाटील यांनी ही खरेदी केली. खरेदीदारांनी लेटर ऑफ इंटेंट आयटी दर्शविले. त्यामुळे या व्यवहाराला मुद्रांक शुल्क लागले नाही. मात्र, दुय्यम निबंधक तारू यांनी एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर (सेस) असे सुमारे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक घेतले नाही. तारू यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस प्रभारी नोंदणी महानिरीक्षक सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे केली होती.