पुणे : शहरात जैवविविधता वाढीसाठी नागरी वन उपक्रम उपयोगी ठरत असल्याने पुण्यातील 'वारजे नागरी वन उद्यान' देशासाठी रोल मॉडेल ठरले आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी देशभर होणार असून, पुण्यातही चार ठिकाणी अशी ऑक्सिजन मास्क ठरणारी नागरी वन उद्याने वन विभागातर्फे स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन साकारली जात आहेत. सध्या चार ठिकाणी नागरी उद्यानांचे काम सुरू आहे. शहरी भागात प्रदूषित हवा स्वच्छ करण्यासाठी झाड महत्त्वाचे कार्य करत आहेत. जमिनीची धूप कमी करणे, धुरापासून तयार होणारे धुके कमी करणे, जमिनीचा कस तयार करणे ही मदत नागरी वनीकरणाने होत आहे. उष्णता व थंडीपासून इमारतींचे संरक्षण करतात. या सर्वांचा अभ्यास करून नागरी वनीकरणाची संकल्पना राबविण्यात आली आहे. पूर्वी वारजे टेकडी हिरवीगार होती. मात्र सिमेंटच्या जंगलांनी ती दिसेनाशी झाली. म्हणून मग वन विभाग आणि स्वंयसेवी संस्थेने येथील जागा स्वच्छ करून वनीकरण करायला सुरवात केली. सुमारे १२ फूट उंचीची देशी झाडे लावल्याने वाढ झपाट्याने झाली आहे.
वारजे येथील वन उद्यान देशासाठी आदर्श प्रकल्प ठरला. शहरात वन विभागाकडून इतर ठिकाणी राबविला जात आहे. त्यावर काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी यासाठी सहकार्य लाभत आहे. - ए. श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक, पुणे