पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:57 IST2025-10-17T12:57:37+5:302025-10-17T12:57:49+5:30
२१ वर्षीय तरुणी दाखला घेण्यासाठी शाळेत आली होती, त्यावेळेस मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने शिपायाने मुलीचा नंबर घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली

पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग
वारजे : कर्वेनगरमधील नामांकित मुलींच्या शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीशी ओळख वाढवून तिला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याबद्दल शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बावधने (वय ४३, रा. कोथरूड) असे गुन्हा दाखल कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित २१ वर्षीय तरुणी तिचा दाखला घेण्यासाठी शाळेत आली होती. त्यावेळेस मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने त्यांची सही राहिली होती. त्यावेळी बावधने याने मुलीचा नंबर घेतला होता व दाखला झाल्यावर कळवितो असे सांगितले होते. त्यानंतर तिला वारंवार मेसेज पाठवून तिला त्रास दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत असल्याचे कारण देत पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील मराठे यांच्या नेतृत्वाखाली कर्वेनगर चौकी व शाळेच्या गेटसमोर आंदोलन केले. विशेष म्हणजे कार्यकर्ते यांनी आंदोलन केल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांना दाद दिली नाही व सुरक्षारक्षकांकडून गेट बंद केले, शिपायाला शाळेच्या मागच्या गेटमधून बाहेर पाठवून दिले. पोलिस शाळेत आल्यानंतर शिपाई शाळेत नव्हता अशी माहिती मराठे यांनी दिली.
दरम्यान बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बावधने यास अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामदास भरसठ करीत आहे. याबाबत मुख्याध्यापिका आशा कांबळे यांना विचारले असता, हे प्रकरण नक्की काय आहे याची मला माहिती नाही, शिपायाने काय केले याबाबतही मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली, संस्थेच्या सचिवांनी मात्र संबंधित शिपायाला निलंबित केले असून त्याच्यावर कारवाई करू आणि शाळेत असे प्रकार होणार नाही याबाबत बैठक घेऊन सक्त सूचना देऊ असे सांगितले.