संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:10 IST2025-12-12T15:07:56+5:302025-12-12T15:10:13+5:30
दुभाजक नसता तर हा ट्रक समोरून आलेल्या कारवर थेट घुसला असता आणि भीषण जीवितहानी झाली असती

संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले
शिवणे : शिवणे गणपती माथा येथील धनगरबुवा परिसरात बुधवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. शिवणेकडून वारजेच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि दुभाजकाला घासत समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धक्क्याची तीव्रता इतकी होती की, लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर जाऊन आदळली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघात इतका गंभीर होता की, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले. कारची समोरील बाजू पूर्णपणे चेंदामेंदा झाली असून, पदपथावर जोरदार आदळल्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवणे गणपती माथा ते धनगरबुवा परिसर हा मोकळा, सरळ आणि रुंद रस्ता असल्याने येथे वाहनांचा वेग अत्यंत जास्त असतो. याच कारणामुळे या भागात अनेकवेळा अपघात होऊन नागरिकांचा जीव गेला आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी येथे दुभाजक बसवण्यात आले होते.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुभाजक नसता तर हा ट्रक समोरून आलेल्या कारवर थेट घुसला असता आणि भीषण जीवितहानी झाली असती. या रस्त्यावर वाहने बेदरकार वेगाने चालवली जात असल्याने नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अतिवेग रोखण्यासाठी येथे तातडीने गतिरोधक किंवा रम्बल स्ट्रिप्स बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना न झाल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालकाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.