पुण्यात २०२५ मध्ये ३६५ दिवसांपैकी १८७ दिवस प्रदूषित, तर ७६ दिवस आरोग्यासाठी चांगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:07 IST2026-02-25T15:06:13+5:302026-02-25T15:07:37+5:30
केवळ पावसाळ्यातच प्रदूषण कमी असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे प्रदूषणावर आता पावसाळाच उपाय असून, त्याव्यतिरिक्त दिवसांचे काय करायचे ? हा प्रश्न बिकट झाला आहे.

पुण्यात २०२५ मध्ये ३६५ दिवसांपैकी १८७ दिवस प्रदूषित, तर ७६ दिवस आरोग्यासाठी चांगले
पुणे : केंद्रीयू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज २४ तास घेण्यात येणाऱ्या हवा गुणवत्ता निरीक्षणाच्या आकडेवारीवरून पुण्यात गतवर्षी ३६५ दिवसांमधील केवळ ७६ दिवस हे आरोग्यासाठी चांगले ठरले. तर, १०२ दिवस समाधानकारक, १०९ दिवस माफक प्रदूषण आणि ७२ दिवस आरोग्यासाठी धोकादायक ठरले. सहा दिवस आरोग्याला हानिकारक ठरणारे दिवस होते. वाढलेली वाहने, बांधकामे, धूळ यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून, केवळ पावसाळ्यातच प्रदूषण कमी असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे प्रदूषणावर आता पावसाळाच उपाय असून, त्याव्यतिरिक्त दिवसांचे काय करायचे ? हा प्रश्न बिकट झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपनगरांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीच्या कणांचा श्वास पुणेकर घेत असून, त्यामुळे ते कायम आजारी पडत आहेत. यावर कोणताही उपाय आता करता येत नाही. केवळ पावसाळ्यात प्रदूषण कमी होत आहे. पुणे महापालिका देखील यावर काहीच करू शकत नाही. त्यांनी वाहनांमधून पाण्याचा फवारा रस्त्यावर मारण्याचा बिनडोक्याचा उपाय सुरू केलेला आहे. त्याचाही काहीच उपयोग होत नाही. पुण्यातील प्रदूषण गतवर्षी कसे होते, याची आकडेवारी आणि विश्लेषण पर्यावरण अभ्यासक व केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे माजी सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी केले. त्यांनी या विषयीची माहिती ‘लोकमत’ला दिली.
पावसाळ्यातील प्रदूषण
मागील काही वर्षांत पावसाळा हा आरोग्यदायी मानला जातो. परंतु, मागील २०२५ वर्षात पावसाळ्यात हे प्रमाण कमी झाले. १२२ दिवसांत ६२ दिवस चांगले, तर ५९ दिवस समाधानकारक, प्रदूषित दिवस केवळ १ होता. पावसाळ्यात १२२ दिवसांत केवळ १ दिवस प्रदूषण नोंदवले गेले.
हिवाळा अतिशय प्रदूषित
खरेतर हिवाळा हा ऋतू अतिशय आरोग्यदायी असतो, परंतु अलीकडे सर्व शहरे प्रदूषित झाल्यामुळे हा ऋतू सुद्धा प्रदूषणामुळे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू लागला आहे. भौगोलिकदृष्ट्या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. या ऋतूत २ दिवस चांगले, १३ दिवस समाधानकारक आणि ४५ दिवस प्रदूषणाचे, तर ५७ दिवस अतिप्रदूषण होते. तर, ६ दिवस धोकादायक प्रदूषणाचे होते. हिवाळ्यातील एकूण १२३ दिवसांपैकी १०८ दिवस प्रदूषण होते.
उन्हाळ्यातील प्रदूषण
उन्हाळ्यात एकूण १२० दिवसांपैकी ७८ दिवस प्रदूषणाचे होते. त्यात चांगले दिवस २, समाधानकारक ४०, तर प्रदूषित ६३ दिवस होते. अतिप्रदूषित दिवस १५ होते.
वर्षात जास्त प्रदूषके कोणती आढळली?
वर्षातील ३६५ दिवसांत सर्वाधिक प्रदूषण सूक्ष्म धूलिकण २.५ चे दिवस ९७ आणि धूलिकण १० मायक्रोमीटरचे प्रमाण १४२ दिवसांचे आढळले. ३८ दिवस जमिनीवरील ओझोन वायूचे प्रमाण सुद्धा जास्त आढळले. वाईट म्हणजे ५० दिवस कार्बन मोनोक्साइड आढळले आणि नायट्रोजन डाय ऑक्साइडचे जास्त प्रमाण ३६ दिवस आढळले.
वायू प्रदूषण निर्देशांक कसा काढतात
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देशातील प्रदूषित क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मापन (CAAQMS) केले जाते. यात सूक्ष्म धूलिकण, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बनडाय ऑक्साइड आणि ओझोन किंवा कमीत कमी मुख्य तीन प्रदूषके ह्याद्वारे AQI निर्देशांक तयार केला जातो. प्रत्येक प्रदूषकांची स्वतंत्र नोंद वेगळी असते. परंतु AQI साठी सर्व प्रदूषके मिळून सरासरी काढल्या जाते. हृदय, फुफ्फुसाच्या, दमा विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांना, लहान मुले आणि वृद्ध लोकांना धोकादायक असतो. नागरिकांनी बाहेर व्यायाम करू नये, धावू नये अशा सूचना दिल्या जातात.
प्रदूषणाचे स्त्रोत आणि आरोग्यावर परिणाम
अनेक शहरांत वाहतूक आणि वाहनांचे प्रदूषण सुद्धा जास्त आहे. पुण्यात हे प्रमाण वाढत आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि बाहेर सर्वच ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरात नागरिकांचे सुध्दा प्रदूषण आहे, जसे खराब रस्ते, त्यामुळे निर्माण होणारी धूळ, वाहनांचा धूर आणि धूळ, तसेच वाहतूक, कचरा जाळणे, लाकूड जाळणे इत्यादी आणि घरातून निघणारे प्रदूषित वायू देखील वाढलेला आहे. या प्रदूषणातून २.५ सूक्ष्म धूलिकण हे फार घातक असतात, त्यामुळे श्वसनाचे अनेक आजार उद्भवतात.