इंदापूरात शेतीच्या नावाखाली अफूचे उत्पादन; ३ जणांना अटक, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:11 IST2025-02-22T17:10:46+5:302025-02-22T17:11:07+5:30
पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी तपासणी केल्यावर अफूची झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले

इंदापूरात शेतीच्या नावाखाली अफूचे उत्पादन; ३ जणांना अटक, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कळस: न्हावी ता इंदापूर येथे शेतीच्या नावाखाली शेतमालात अफुसारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उत्पादन करणाऱ्या ३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे २७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. वालचंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करताना पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक, महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह न्हावी गावात जाऊन मिळालेल्या माहितीचे आधारे शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी रतन कुंडलिक मारकड व बाळु बाबुराव जाधव यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड विक्री करण्याच्या उद्देशाने करून उत्पादन घेतल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चहुबाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. त्यादरम्यान त्याच परिसरातील कल्याण बाबुराव जाधव (वय ६५ वर्षे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे) हे त्यांच्या शेतात उपस्थित असताना त्या शेताची पाहणी केली असता, त्यांचे शेतांमध्ये देखील अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. या कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करण्यात आलेली आहेत. आरोपींवर विरोधात वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.