पुणे महापालिकेच्या जलतरण तलावांवर चालकांची मनमानी; आकारले जाते तिप्पट शुल्क, पुणेकरांना नाहक भुर्दंड
By राजू हिंगे | Updated: March 23, 2026 13:07 IST2026-03-23T13:06:52+5:302026-03-23T13:07:38+5:30
काही जलतरण तलावांवर २० ऐवजी ५० रुपये आणि काही तलावांवर थेट १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आले. तर काही ठिकाणी मासिक पाससाठी नागरिकांना ५०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत

पुणे महापालिकेच्या जलतरण तलावांवर चालकांची मनमानी; आकारले जाते तिप्पट शुल्क, पुणेकरांना नाहक भुर्दंड
पुणे: उन्हाळ्याचा वाढता चटका आणि शाळांना सुट्टी लागल्यामुळे जलतरण तलावावर पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पण पुणे महापालिकेच्या ३५ पैकी ११ जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत. त्यातच पालिकेच्या सुरू असलेल्या अनेक जलतरण तलावांवर चालकांची मनमानी सुरू असून, निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जात आहे. काही ठिकाणी निर्धारित शुल्कापेक्षा दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट शुल्क आकारण्यात येत असून, त्याचा नाहक भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
पुणे महापालिकेचे एकूण ३५ जलतरण तलाव आहेत. त्यामुळे उन्हाळ्याचा चटका आणि शाळांना सुट्टी लागल्यामुळे जलतरण तलाव सुरू असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याचा गैरफायदा जलतरण तलाव चालक घेत आहेत. महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव नागरिकांना सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने बांधले जात असल्याने तेथे माफक शुल्क आकारले जाते. त्यानुसार दैनंदिन शुल्क वीस रुपये आणि मासिक पाससाठी जास्तीत जास्त साडेतीनशे रुपये आकारण्याचे बंधन महापालिकेने घातले आहे. विद्यार्थ्यांसाठी अडीचशे रुपयांत मासिक पास उपलब्ध करून देण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र,काही जलतरण तलावांवर वीस रुपयांऐवजी पन्नास रुपये आणि काही तलावांवर थेट शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी मासिक पाससाठी नागरिकांना पाचशे रुपयांपासून हजार रुपये मोजावे लागत आहेत. महापालिकेने ठरवून दिलेले दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते आहे.
महापालिकेने ठरवून दिलेले दर आणि आमचे दर वेगवेगळे आहेत. तलावाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च आम्ही करतो, पाणीही आम्ही विकत आणतो. मात्र, आता सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हाला ५० ते ८० रुपये प्रवेश शुल्क आकारल्याशिवाय पर्याय नाही असे एका जलतरण तलावचालकांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
महापालिकेच्या जलतरण तलावांचे दर
दैनंदिन : २० रुपये
मासिक शुल्क : जास्तीत जास्त ३५० रुपये
विद्यार्थी पास : २५० रुपये
वार्षिक पास : ३२०० रुपये
वार्षिक विद्यार्थी पास : २००० रुपये
सार्वजनिक संस्था, शाळा-कॉलेजसाठी तलावाचे भाडे : १५०० रुपये
सभासद प्रवेश शुल्क : ५० रुपये...
जलतरण तलावाच्या दरात १५ वर्षापासून वाढ नाही
महापालिकेने जलतरण तलावाचे दर २०११ मध्ये निश्चित केले होते. मात्र गेली १५ वर्ष या दरात वाढ करण्यात आलेली नाही. मात्र गेल्या १५ वर्षांत विजेचे दर, क्लोरिन, जीवरक्षक, साफसफाई कर्मचारी यांचे वेतन वाढले आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे पालिकेने निश्चित केलेले दर परवडत नाही. त्यामुळे जलतरण तलावाच्या दरात वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.
११ जलतरण तलाव बंद
पुणे महापालिकेच्या मालकीचे ३५ जलतरण तलाव आहेत. त्यापैकी ११ जलतरण तलाव बंद आहेत. त्यामधील एक जलतरण तलाव न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे बंद आहे. दुरुस्तीच्या विविध कामांसाठी एकूण १० जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे ३५ पैकी ११ जलतरण तलाव बंद असून सध्या २४ जलतरण तलाव सुरू आहेत.