खुलेआम भोंदूगिरी भयानक शोषणकारी; अशा बाबा-बुवांची यादी पोलिसांना देणार, पुण्यातून ‘अंनिस’चे महत्वाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:59 IST2026-03-24T11:58:40+5:302026-03-24T11:59:10+5:30
आपापल्या परिसरातील भोंदू बाबांबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ९९२२०४८८३२, ८०८७८७६८०९ या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करत आहे

खुलेआम भोंदूगिरी भयानक शोषणकारी; अशा बाबा-बुवांची यादी पोलिसांना देणार, पुण्यातून ‘अंनिस’चे महत्वाचे पाऊल
पुणे: ज्योतिषी-बाबा-बुवा आणि राजकारणी-सरकारी अधिकारी-धनदांडग्या प्रभावशाली व्यक्ती यांची साठ-गाठ किती भयानक शोषणकारी असते, याचे हादरवून टाकणारे चित्र ज्योतिषी अशोक खरातच्या प्रकरणातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर आले आहे. या पुढील काळातील प्रत्येक जिल्ह्यातील अशा प्रमुख शोषणकारी भोंदू बाबांची यादी व शक्य असेल तेथे यासंदर्भातील पुरावे असलेला पेन ड्राइव्ह ‘अंनिस’चे कार्यकर्ते जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सुपुर्द करणार आहेत. या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास व्हावा, गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, तसेच पुन्हा असे प्रकार घडू नयेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या (अंनिस) वतीने करण्यात आली आहे.
सामान्य नागरिक व पीडित व्यक्ती या बुवा-बाबांकडून होणाऱ्या शोषणासंदर्भात अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधत असतात. प्रत्येक जिल्ह्यातील अशा प्रमुख शोषणकारी भोंदू बाबांची यादी अंनिसचे कार्यकर्ते जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सुपुर्द करणार आहेत. अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी सोमवारी (दि.२३) राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले.
अंनिसची हेल्पलाइन
आपापल्या परिसरातील भोंदू बाबांबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ९९२२०४८८३२, ८०८७८७६८०९ या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करत आहे. ज्योतिषी, भोंदूबाबा महिलांचे शोषण करत असल्यास हेल्पलाइन क्रमांक ९४२२३०५९२९ यावर संपर्क करावा. याद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे तथ्य तपासून वेळोवेळी त्यांची यादी अंनिस पोलिसांना देणार आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करण्याची मागणी
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर २०१३ साली जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. याला एक तप उलटून गेले, तरीही शासनाने या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. या नियमांचा प्रस्तावित मसुदा महाराष्ट्र अंनिसने याआधी शासनाला सादर केलेला होता, परंतु लवकरच पुन्हा एकदा अंनिसच्या वतीने या नियमांचा मसुदा सामाजिक न्याय विभागाला सादर करण्यात येईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या सर्व मागण्यांची मांडणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, नीता सामंत, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, श्रीपाल ललवाणी यांच्या वतीने देण्यात आली.