ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता, त्यालाच उमेदवारी मिळणार; बावनकुळेंचे सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:18 IST2025-11-12T17:18:13+5:302025-11-12T17:18:49+5:30
महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल, स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे लढण्याची वेळ आली तर महायुतीमध्ये वाद होणार नाहीत

ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता, त्यालाच उमेदवारी मिळणार; बावनकुळेंचे सूतोवाच
पुणे : महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे एक चांगले सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातून काही अंदाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहेत. आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी ज्याला जनतेच्या मनात स्थान आहे, ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता आहे, त्यालाच उमेदवारी मिळणार, असे सुतोवाच राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने बावनकुळे यांची राज्य निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी बुधवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती ५१ टक्क्याच्या वर मते घेऊन निवडून येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, शंभुराजे देसाई यांच्यासह आम्ही समन्वय समितीची बैठक घेतली. या बैठकीत जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे लढण्याची वेळ आली तर महायुतीमध्ये वाद होणार नाहीत, वितुष्ठ येणार नाही, मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत झाला.
दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, या निवडणुका स्थानिक पातळीवरील आहेत. त्यामुळे काही ठिकाणी भाजप - राष्ट्रवादी, काही ठिकाणी भाजप - शिवसेना अशी लढत होऊ शकते. अशा वेळी राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणाला सोबत घेऊन लढायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, ज्या ठिकाणी आमच्या समोर घड्याळ किंवा धनुष्यबाण चिन्ह असेल तेथे आम्ही मनभेद होणार नाही, याची काळजी घेवू, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने दोषी ठरवल्यावर विचार करू
तुळजापूर येथील एका गुन्हेगारास भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, एखाद्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे तो गुन्हेगार होत नाही. गुन्ह्यातून त्याला शिक्षा झाली तर तो गुन्हेगार होतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्याला मुक्त केले असेल तर त्याला एक मत देण्याचा, राजकारण करण्याचा अधिकार आहे. संबंधीताला न्यायालयाने दोषी ठरवले तर आम्ही त्याचा विचार करू, असे म्हणून गुन्हेगाराच्या प्रवेशाचे समर्थन केले.
बावनकुळे असेही म्हणाले....
- केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.
- बिहारमधील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. बिहारला डबल इंजिन सरकारची गरज आहे.
- देशातील जनतेला विकसित भारत हवा आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपचा विजय होईल.
- ओबीसी समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले, ते देवेंद्र फडणवीस यांनी परत आणले.
- ज्याच्याकडे कुणबी व ओबीसी प्रमाणपत्र आहे, त्याला ओबीसी कोट्यातून निवडणूक लढवता येते.
- शरद पवार यांनी मूळ ओबीसी ही संकल्पना कुठून आणली कळत नाही.