६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:47 IST2025-03-20T09:46:07+5:302025-03-20T09:47:52+5:30
सामान पाणीपुरवठा योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही

६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर
पुणे: समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारलेल्या ४३ पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण होऊनही जलवाहिन्या जोडल्या गेल्या नाहीत. परिणामी या टाक्यांचा वापर होत नाही. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पूर्ण झालेल्या ६५ टाक्यांपैकी
टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा उपयोग केला जात आहे. हे उत्तर धक्कादायक होते. तेच प्रशासन आता २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचे सांगत आहे.
महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबविण्यासाठी आणि पुणेकरांना उच्च दाबाने समान पाणीपुरवठा करण्यासाठी अडीच हजार कोटींची समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे.
योजनेच्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर, ७ नागरी सुविधा केंद्रे आणि ५ नवीन पंपिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची कामे करण्यास आजवर चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकाच म्हणते....
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८६ पाणी साठवण टाक्यांपैकी ६५ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० टाक्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली असून, ९ टाक्यांची कामे ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास झाली आहेत. दोन टाक्यांना अद्याप जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. काम पूर्ण झालेल्या ६५ पैकी केवळ २२ टाक्यांचा वापर पाणीपुरवठ्याच्या कामासाठी सुरू आहे. उर्वरित ४३ टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या व वितरण करणाऱ्या वाहिन्या जोडलेल्या नाहीत. त्यामुळे या टाक्यांचा वापर मागील अनेक महिन्यांपासून होत नाही.
केवळ एकाच टाकीचा होतो वापर
माहिती अधिकार कार्यकर्ते भरत जैन सुराणा यांनी माहिती अधिकारात समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीसंदर्भात माहिती मागितली होती. त्या अर्जावर प्रशासनाने जानेवारीत दिलेल्या उत्तरात काम पूर्ण झालेल्या टाक्यांपैकी कात्रज येथील सर्व्हे नं. १२७ मधील केवळ एका टाकीचा वापर सुरू असल्याचे सांगितले हाेते. तेच प्रशासन आता मात्र पाणी पाणीपुरवठ्यासाठी २२ टाक्यांचा वापर केला जात असल्याचे तोंडी सांगत आहे. मग एका महिन्यात २१ टाक्या कार्यान्वित झाल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जास्त काही बोलू शकत नाही...
शहरातील नागरिकांना समान व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मोठा गाजावाजा करून आणण्यात आली. चार वेळा मुदतवाढ देऊनही योजनेचे काम ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे प्रशासन सांगते. मात्र, ज्या भागात योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागात पूर्वीप्रमाणेच पाण्याच्या समस्या आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनीच सांगितले की, ‘या योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही.’ अधिकाऱ्याच्या या उत्तराने योजनेच्या माध्यमातून पांढरा हत्ती तर पोसला जात नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.