शुभदा कोदारे हत्या प्रकरण! तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांची भूमिका घेणारे मदतीला आलेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:12 IST2025-01-10T13:11:04+5:302025-01-10T13:12:03+5:30
आरोपी तरुणीवर हल्ला करत असताना ४० ते ५० लोक उभे असतानाही मदतीला कोणीही आलेच नाही, नाहीतर कदाचित शुभदा वाचली असती

शुभदा कोदारे हत्या प्रकरण! तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांची भूमिका घेणारे मदतीला आलेच नाहीत
पुणे : शहरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे हिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ७) घडला. त्यानंतर गुरुवारी या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ४० ते ५० लोक उभे असतानाही आरोपी तरुणीवर हल्ला करताेय आणि बाकी लाेक बघ्याची भूमिका घेतात. तिच्या मदतीला काेणी गेले नसल्याचे या व्हिडीओतून समोर आले आहे. शुभदाला तात्काळ मदत मिळाली असती, तर ती आज वाचली असती. तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांच्या भूमिकेत असणाऱ्यांमध्ये काही माणुसकी शिल्लक होती की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
आराेपी आणि मृत तरुणी सन २०२२ मध्ये डब्लू.एन.एस. कंपनीत एकत्र काम करत हाेते. तेव्हा त्यांचा एकमेकांशी परिचय झाला. पुढे मैत्री झाली. कृष्णाच्या म्हणण्यानुसार, शुभदा हिने वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या तातडीच्या उपचारांसाठी त्याच्याकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. मात्र, दिवसेंदिवस तिची पैशांची मागणी वाढत चालली होती. त्यामुळे कृष्णा याला संशय आला. त्याने अडीच-तीन महिन्यांपूर्वी शुभदा हिचे कराड येथील घर गाठले. तिथे त्याने वडिलांकडे विचारणा केली. त्यावेळी शुभदा हिने आपल्याकडून घेतलेले पैसे वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी वापरले नसल्याचे पुढे आले.
कोयत्याने वार, तरुणीचा खून अन् बघ्यांची गर्दी; येरवड्यातील त्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल..#pune#yerwada#Police#crimepic.twitter.com/5FmsZk5Iyd
— Lokmat (@lokmat) January 9, 2025
कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच आहे. आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याच्या डोक्यात बसले होते. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकवण्याचे ठरवले. त्याला शुभदाला जखमी करायचे होते. मात्र, रागात त्याने कोयत्याने वार करत तिचा खून केला. याबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातून लोकांमध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आरोपी कृष्णा कनोजा याने स्वतः सोबत आणलेल्या कोयत्याने शुभदाच्या हातावर वार केले. यावेळी मोठ्या संख्येने तिच्या कार्यालयातील सहकारी, ड्रायव्हर उपस्थित होते. यावेळी कोयता हातात घेऊन कृष्णा शांत डोक्याने तिच्या जवळपास वावरत होता. त्याचवेळी जर बघ्यांनी एकत्रित मिळून आरोपीवर चाल केली असती, तर शुभदा आज जिवंत असती.
कृष्णाने तिच्यावर वार केल्यानंतर शुभदाने कुणाला तरी फोन लावला होता, तो फोनदेखील आरोपीने तिच्याकडून घेतल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळी कृष्णाने त्याच्या हातातील हत्यार बाजूला फेकून दिले, त्यानंतर नागरिक त्याच्यावर धावून गेले. त्याला मारहाणही केली. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभदाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्य कुणीही दाखवले नाही.
पाेलिस आयुक्तांना इशारा
राजकीय हस्तक्षेप नसल्यास पोलिस चांगले काम करतात. त्यामुळेच पुण्यात आत्तापर्यंत हस्तक्षेप केला जात नव्हता. पोलिसांना पायाभूत सुविधा देऊनही जर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्यास संबंधित पोलिस अधिकारी कमी पडत आहेत, असे माझे मत आहे. नेमून दिलेले काम त्यांना जमत नसल्यास त्यांनी स्पष्ट सांगावे, हे आमच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे इतर दुसरे चांगले अधिकारी आणून गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम करू. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोमवारी मुंबईत पाठपुरावा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.