MBA Admission 2025 : आता घरबसल्या करा 'एमबीए'; प्रवेश प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:30 IST2025-07-12T13:29:53+5:302025-07-12T13:30:09+5:30
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्राचा उपक्रम

MBA Admission 2025 : आता घरबसल्या करा 'एमबीए'; प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फत २०२५-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, व्यवस्थापन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी; तसेच नोकरी करीत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही खरी सुवर्णसंधी आहे.
हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आहे. विशेष म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबवला जातो. त्यामुळे घरबसल्या किंवा व्यवसाय सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होणार आहे.
यात विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड व्याख्याने, थेट संवाद सत्रे, ई-अभ्याससामग्री, डिजिटल लायब्ररी आणि ऑनलाइन परीक्षा सुविधा पुरवण्यात येतात. हा अभ्यासक्रम चार सत्रांमध्ये पूर्ण करता येणार आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थी उद्योगजगतातील बदलत्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करू शकतील.
इच्छुक विद्यार्थी https://cdoe.sppuef.in/MBA-Online या अधिकृत संकेतस्थळावर किंवा https://www.unipune.ac.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहेत. यात अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रवेश घेण्यात काही अडचणी आल्यास, त्यांनी केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
पात्रता
१. विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे.
२. खुल्या प्रवर्गासाठी किमान ५० टक्के, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान ४५ टक्के गुणांची आवश्यकता.
३. वयाची कोणतीही अट नाही. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आवश्यक नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन एमबीए या माध्यमातून कमी शुल्कात उच्चशिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. - डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ