देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन लोन अॅपचा भांडाफोड;मुंबईतून संशयित अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 21:01 IST2025-07-12T21:01:05+5:302025-07-12T21:01:27+5:30
लिंकवर क्लिक केल्यावर तिच्या मोबाईलचा पूर्ण अॅक्सेस संशयिताने घेतला आणि तिच्या नावावर फसव्या लोनची प्रक्रिया करून पैसे वसूल करण्यासाठी विविध क्रमांकांवरून धमकी दिली.

देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन लोन अॅपचा भांडाफोड;मुंबईतून संशयित अटकेत
पिंपरी : देशभरातील हजारो नागरिकांना बनावट ऑनलाइन लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई येथून संशयितास अटक केली.
इसाकी राजन थेवर (२९, रा. वाशी, मुळ रा. तमिळनाडू) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महाळुंगे येथील महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादी महिलेला ‘क्रेडीट पायलट’ या नावाने आलेल्या लिंकवरून लोन मिळेल अशा बहाण्याने फसवण्यात आले. लिंकवर क्लिक केल्यावर तिच्या मोबाईलचा पूर्ण अॅक्सेस संशयिताने घेतला आणि तिच्या नावावर फसव्या लोनची प्रक्रिया करून पैसे वसूल करण्यासाठी विविध क्रमांकांवरून धमकी दिली. या गुन्ह्यात फिर्यादीकडून अबू सिद्दिक, राकेश कुमार साहू आणि रितिक सिंग या नावाने असलेल्या यूपीआय आयडीवर एकूण नऊ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर आणखी १५ हजारांची मागणी करत धमकी देऊन मोबाईलमधील फोटो मॉर्फ करून नातेवाईकांना पाठवले.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणातून लोन अॅपचे आयपी लाॅग्स तपासण्यात आले असता ते मुंबई येथून चालवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मुंबई येथून संशयित इसाकी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लॅपटॉप, ७ सिमकार्ड, २ डेबिट कार्ड आणि १ मोबाईल जप्त केला.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे, दीपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, सचिन घाडगे, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, नितेश बिच्चेवार, सोपान बोधवड, माधव आरोटे, स्वप्नील खणसे, वैशाली बर्गे, शुभांगी ढोबळे, दीपाली चव्हाण, भाविका प्रधान यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सिंगापूरमधील चिनी व्यक्तीच्या सांगण्यावरून अॅप डेवलप
क्रेडिट पायलट हे अॅप मुंबई येथे डेवलप केल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. विशेष म्हणजे फसवणुकीसाठीचे अॅप सिंगापूरमधील एका चिनी व्यक्तीच्या सांगण्यावरून डेव्हलप करण्यात आले होते.
देशभरात १० हजारांवर तक्रारी
संशयिताने क्रेडिट पायलट व्यतिरिक्त क्रेडिटकीपर, इनलोनक्रेडिट, न्यू-लोन, लिगललोन, फास्टकॅश, हॅन्डीकॅश, इन्स्टा-लोन अशा अनेक अॅप्सच्या माध्यमातून भारतभर हजारो लोकांची फसवणूक केली आहे. या अॅपवरून फसवणूक केल्याप्रकरणी देशभरात १० हजारांवर तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे दिसून आले आहे.