FYJC Admission 2025: अकरावीच्या केंद्रीय प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज सुरू; पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:19 IST2025-05-19T13:17:41+5:302025-05-19T13:19:04+5:30
FYJC Admission 2025 News: कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मेपर्यंतची मुदत दिली असून विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मेपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते

FYJC Admission 2025: अकरावीच्या केंद्रीय प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज सुरू; पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
पुणे: यंदा पहिल्यांदाच राज्यभर अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातील ९ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांना बुधवारपासून (२१ मे) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यभरात अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय, ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी ‘mahafyjcadmissions.in’ या संकेतस्थळाची निर्मिती करून त्यावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मेपर्यंतची मुदत दिली होती. तर विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मेपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी २१ मेपासून सुरू होत आहे. त्यात २१ ते २९ मेदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे किमान एक ते कमाल दहा प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत. या ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्तायादी ३० मे रोजी जाहीर केली जाणार आहे. या यादीवर १ जूनपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्तायादी जाहीर होऊन ६ ते १२ जून या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
सरावासाठी दोन दिवस
विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानुसार १९ आणि २० मे रोजी ऑनलाइन अर्ज भरणे, प्राधान्यक्रम नोंदविण्याचा सराव विद्यार्थी करू शकणार आहेत. त्यानंतर २१ मे रोजी नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.
राखीव कोट्यातील प्रवेश ३ जूनपासून
पहिल्या फेरीसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना अंतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोट्यातील राखीव जागांसाठी देखील अर्ज करता येणार आहे. या राखीव जागांवरील प्रवेश ३ जूनपासून देता येणार आहे.
प्रवेश शुल्कही ‘ऑनलाइन’
कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेश शुल्काची रक्कम ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी लागणार आहे.
राज्याची एकूण प्रवेश क्षमता : २० लाख ४३ हजार २५४
शाखानिहाय क्षमता
विज्ञान : ८ लाख ५२ हजार २०६
वाणिज्य : ५ लाख ४० हजार ३१२
कला : ६ लाख ५० हजार ६८२
पुणे विभागात शाखानिहाय जागा किती?
एकूण - ३ लाख ७५ हजार ८४६
विज्ञान - १ लाख ७० हजार १७०
वाणिज्य - १ लाख १ हजार ९७१
कला - १ लाख ३ हजार ७०५
ही माहिती जाणून घ्या...
- जे विद्यार्थी कॅॅप किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात, त्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली समजली जाईल.
- एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येईल.
- नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारला जाईल.
- सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
- व्यवस्थापन/ इन-हाऊस/अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश ६ जून २०२५ पासून सुरू होतील.