एका माणसाची चूक अन् विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का; आव्हाड - पडळकर प्रकरणावर भुजबळांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:50 IST2025-07-26T17:49:06+5:302025-07-26T17:50:12+5:30
विधानभवनात काही फक्त फिरण्यासाठी वा कोणाला तरी भेटून काम सांगण्यासाठी येतात, काहींचा तर वेगळाच धंदा झालेला आहे

एका माणसाची चूक अन् विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का; आव्हाड - पडळकर प्रकरणावर भुजबळांची नाराजी
इंदापूर : पूर्वी सभागृहाची कार्यपद्धत व परंपरांना मान दिला जात होता. आता मात्र या सगळ्यांचे चित्र पालटले आहे. शिस्त, परंपरा हरवत चालली, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानमंडळात होत असलेल्या राड्यांवर खरमरीत भाष्य केले आहे. समता परिषदेचे लढाऊ नेते, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी (दि.२४) छगन भुजबळ यांनी गुरुवारी भेट दिली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, ४१ वर्षांपूर्वी मी विधानमंडळात आलो. १९९१ मध्ये महसूल मंत्री होतो. त्यानंतर अनेक मंत्रिपदे भूषवली. केशवराव धोंडगे, दत्ता पाटील, विलासराव देशमुख, शरद पवार, गणपतराव पाटील, नितीन गडकरी, राम नाईक, प्रतापराव पाटील, एन.डी.पाटील यांच्यासारखे परखड अभ्यासू नेते सभागृहात असत. सभागृहात टोकाच्या चर्चा झाल्यानंतर सर्व जण बाहेर एकत्र बसून चहा घेत असत. या सर्वांमध्ये एक शिस्त होती. सभागृहाच्या कार्यपद्धतीला, परंपरांना मान दिला जात होता. आता मात्र या सगळेच चित्र पालटले आहे.
आव्हाड व पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, काही लोक खरेच कामासाठी, लोकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी घेऊन येतात. तर काही फक्त फिरण्यासाठी वा कोणाला तरी भेटून काम सांगण्यासाठी येतात. काहींचा तर वेगळाच धंदा झालेला आहे. याच वेळी प्रश्नांवर उत्तर शोधणारे काही प्रामाणिक लोकही आहेत. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्री प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्र्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याने ही अतिशय कष्ट करणारा मनुष्य आहे, असे मत व्यक्त केले आहे. अशा पार्श्वभूमीवर एक माणूस चूक करतो, त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदार व विधानभवनाच्या प्रतिमेला धक्का बसतो. असे म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.