लोणावळा येथील एस पॉईटच्या दरीत जीप पडून १ जण ठार; तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 15:46 IST2018-09-28T15:35:35+5:302018-09-28T15:46:38+5:30
मौजमजा केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याकडे येत असताना मार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाडाझुडपातून थेट दिडशे ते दोनशे फुट खोल दरीत कोसळली.

लोणावळा येथील एस पॉईटच्या दरीत जीप पडून १ जण ठार; तीन जखमी
लोणावळा : लोणावळा लायन्स पॉईंट मार्गावरील एस पॉईंट याठिकाणी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील कार सुमारे दिडशे फुट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात कारमधील एक जणाचा जागीच मृत्यु झाला तर एका युवतीसह तीन जण जखमी झाले आहेत. मनिष रमेश प्रितवाणी (वय २५, रा. खारघर, मुंबई) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. लोणावळा ते लायन्स पॉईंट दरम्यानच्या मार्गावर चढउतार व तीव्र वळणे आहेत. रात्री उशिरा हे पर्यटक चारचाकी गाडीने लायन्स पॉईट परिसरात गेले होते. त्याठिकाणी मौजमजा केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याकडे येत असताना मार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाडाझुडपातून थेट दिडशे ते दोनशे फुट खोल दरीत कोसळली. यामध्ये मनिष याचा मृत्यु झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण दारुच्या नशेत असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघाताची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस पथक व शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे कार्यकर्ते रोहित वर्तक, योगेश उंबरे, राजेंद्र कडु, आनंद गावडे, समिर जोशी, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, अशोक उंबरे, प्रविण देशमुख, महेश मसणे, राजु पाटील, वैष्णवी भांगरे, दिनेश पवार, साहेबराव चव्हाण, अभिजित बोरकर सुनिल गायकवाड यांनी घटनास्थळाचा शोध घेत दरीत शोध मोहीम राबवत पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास सर्वांना दरीतून बाहेर काढत जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले तर मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा तपास करत आहे.