शेतकरी आत्महत्यापासून ते स्वातंत्र्यसंग्राम विषयांवरील एकांकिका; फिरोदिया करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:47 IST2025-02-18T09:43:46+5:302025-02-18T09:47:26+5:30
लेखन, दिग्दर्शन, अभिनय या मूलभूत नाट्य पैलूबरोबरच संगीत, वादन, नृत्य आणि चित्रकला, शिल्पकला यासारख्या बहुविध कला प्रकारांची एकत्र गुंफण करत सादरीकरण

शेतकरी आत्महत्यापासून ते स्वातंत्र्यसंग्राम विषयांवरील एकांकिका; फिरोदिया करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात
पुणे: शेतकरी आत्महत्यापासून ते स्वातंत्र्यसंग्राम, खेळ, प्रेमापासून ते नव्या पिढीचा वैरभाव, त्यातून घेतलेले सूड अशा विविध विषयांवरील एकांकिकेने फिरोदियाची प्राथमिक फेरी पार पडली. यावर्षी मराठीबरोबरच हिंदी-इंग्रजी-उर्दू अशा अनेक भाषांत कलागुण सादर झाले. या फेरीतून अंतिम फेरीसाठी ९ संघ निवडण्यात आले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक भावविश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे हे ५१ वे वर्ष आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृह, पद्मावती येथे यावर्षीच्या प्राथमिक फेरीचे आयोजन केले होते. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या मूलभूत नाट्य पैलूबरोबरच संगीत, वादन, नृत्य आणि चित्रकला, शिल्पकला यासारख्या बहुविध कला प्रकारांची एकत्र गुंफण, एक कथा सूत्रात करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे सादरीकरण करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण सतीश देशमुख, योगेश फुलपगर, सारंग कुलकर्णी, आरती वडगबाळकर, ऋषिकेश पोतदार आणि ओंकार शिंदे यांनी केले. यातून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघाची स्पर्धा येत्या शनिवार (दि.२२) ते रविवारी (दि.२३) आयोजित केलेली आहे, असे स्पर्धेचे संयोजक सूर्यकांत कुलकर्णी आणि अजिंक्य कुलकर्णी यांनी सांगितले.
प्राथमिक फेरीत निवडले गेलेले संघ
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (आकुर्डी), टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी.