"घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले अन्..." कोथरूडमधील लज्जास्पद घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 21:17 IST2022-12-16T21:16:40+5:302022-12-16T21:17:28+5:30
पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली

"घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले अन्..." कोथरूडमधील लज्जास्पद घटना
पुणे/किरण शिंदे : कोथरूडमधील एका प्रसिद्ध लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. विशेष म्हणजे लॅब मालकाच्या कारवर चालक असणाऱ्या व्यक्तीनेच हे कृत्य केले. घरी सोडण्याच्या पाहण्याने आरोपीने या तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. 9 डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
मेघबहादुर भवानीराव रावल (वय 39, रा. रामबाग कॉलनी, कोथरूड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कर्वे रस्ता परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीने या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी पौड फाटा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध लॅबमध्ये काम करते. तर आरोपी त्याच लॅबच्या मालकाच्या चार चाकीवर चालक म्हणून काम करतो. 9 डिसेंबर रोजी रात्री काम संपल्यानंतर फिर्यादी तरुणी घरी जात असताना " ही साहेबांचीच कार आहे, मी कर्वेनगरकडे चाललो आहे, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो" असे सांगून त्याने फिर्यादीला कारच्या पुढील सीटवर बसवले.
पौड रस्त्यावरून गाडी करिष्मा चौकात आल्यानंतर रस्त्याच्या साईडला गाडी घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या अंगाला वेगवेगळ्या ठिकाणी हात लावून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली आहे. अधिक तपास सुरू आहे.